चिपळूण: शिवनदी परिसरातील वाहनतळावर भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

चिपळूण:  शहरातील शिवनदी परिसरात असलेल्या वाहनतळ येथे शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या परिसरात मोठ्या प्रमाणात तोडलेली सुकलेली झाडे साठवून ठेवण्यात आली होती, ज्यांनी अचानक पेट घेतल्याने ही आग भडकली. घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने बंबासह घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर ही आग पूर्णपणे विझवली. या मदतकार्यात पाणी पुरवठा समिती सभापती निहार कोवळे यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह सक्रिय सहभाग नोंदवला.

शिवनदीच्या या परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात कार, बसेस व अन्य खाजगी वाहनांचे पार्किंग असते, तसेच बाजूलाच भंगारचे गोडाऊनही आहे. आगीची ही घटना वेळीच लक्षात आल्याने आणि अग्निशमन दलाने ती तातडीने आटोक्यात आणल्यामुळे अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचली, अन्यथा शहरात मोठी हानी आणि वित्तहानी होण्याची शक्यता होती. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती, मात्र नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *