GRAMIN SEARCH BANNER

लोटेतील घातक ‘पीएफएएस’ रसायन निर्मिती विरोधात पत्रकार अनुज जोशी आक्रमक; प्रजासत्ताक दिनी आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा

Gramin Varta
76 Views

खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेले पी.एफ.ए.एस. (PFAS) या घातक रसायनाचे उत्पादन तातडीने थांबवावे आणि कोकणासाठी शिफारस केलेल्या विविध पर्यावरण समित्यांच्या अहवालांची काटेकोर अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी पत्रकार आणि पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते अनुज अनंत जोशी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास २६ जानेवारी रोजी आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला असून, यासंदर्भातील सविस्तर निवेदन त्यांनी बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना स्पीड पोस्टद्वारे पाठवले आहे.

अनुज जोशी यांनी आपल्या निवेदनातून लोटे एमआयडीसीमधील प्रदूषणाच्या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. पी.एफ.ए.एस. या रसायनांना ‘फॉरएव्हर केमिकल्स’ असेही संबोधले जाते, कारण ही रसायने निसर्गात सहजासहजी नष्ट होत नाहीत. ती पाणी, माती आणि अन्नसाखळीत मिसळून मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. जागतिक संशोधनातून या रसायनांचा संबंध कर्करोग, हार्मोनल बिघाड आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यांसारख्या गंभीर आजारांशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) अन्न पॅकेजिंगमध्ये या रसायनाचा वापर बंद करण्याचा प्रस्ताव मांडलेला असताना, दुसरीकडे लोटेसारख्या आधीच प्रदूषणग्रस्त भागात अशा रसायनांचे उत्पादन सुरू होणे हे राष्ट्रीय धोरणांशी विसंगत असल्याचे जोशी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

कोकणातील संवेदनशील पर्यावरण लक्षात घेऊन माधव गाडगीळ समिती, के. रंगनाथन समिती आणि नारायण राणे समितीने प्रदूषणकारी व धोकादायक रासायनिक उद्योग टाळण्याच्या स्पष्ट शिफारशी केल्या होत्या. मात्र, या अहवालांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याबद्दल निवेदनात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. लोटे परिसरातील रासायनिक प्रदूषणामुळे यापूर्वीच नागरिकांच्या आरोग्यावर आणि शेतीवर विपरीत परिणाम झाल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत, या पार्श्वभूमीवर नवीन घातक प्रकल्पांना परवानगी देणे चिंताजनक बाब ठरत आहे.

या गंभीर विषयावर माध्यमांशी बोलताना अनुज जोशी यांनी सरकारकडे ठोस कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी हे निवेदन गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह खेडचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांनाही दिले आहे. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडताना त्यांनी सरकारला २० जानेवारी २०२६ पर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत समाधानकारक निर्णय न झाल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी काळी फित लावून आणि संपूर्ण दिवस उपवास करून आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.
या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणाच्या हेतूने कोकणवासियांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. २६ जानेवारीला पर्यावरणप्रेमींनी काळी फित लावून आपले फोटो #BanPFAS, #PMO, #CMO, #Maharashtra आणि #India2026 या हॅशटॅगसह फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब आणि व्हॉट्सॲपवर अपलोड करून समर्थन दर्शवावे, अशी विनंती जोशी यांनी केली आहे. विशेष म्हणजे, या लढ्याला रत्नागिरी जिल्हा पर्यावरण विषयी संस्था फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य पर्यावरण संस्था फेडरेशनने आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. आता राज्य सरकार आणि संबंधित प्रशासन या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3369755
Share This Article