रत्नागिरी: गोळप कट्टाच्या मार्च २०२६ मधील ७७ व्या कार्यक्रमात रत्नागिरीचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध बुद्धिबळ पंच विवेक सोहनी यांची विशेष मुलाखत संपन्न झाली. अविनाश काळे यांनी घेतलेल्या या प्रदीर्घ मुलाखतीत सोहनी यांनी आपला सामान्य ते आंतरराष्ट्रीय पंच असा थक्क करणारा प्रवास श्रोत्यांसमोर उलगडला. मूळचे बसणी गावचे असलेले सोहनी यांनी आपले प्राथमिक शिक्षण पटवर्धन हायस्कूल, तर उच्च शिक्षण अभ्यंकर कुलकर्णी महाविद्यालय आणि फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेजमधून पूर्ण केले. पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असूनही बुद्धिबळाची ओढ त्यांना या क्षेत्रातील सर्वोच्च शिखरावर घेऊन गेली. २०१३ मध्ये रत्नागिरीत झालेल्या एका स्पर्धेत सहाय्यक पंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि तिथूनच त्यांच्या नव्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
मुलाखतीदरम्यान सोहनी यांनी बुद्धिबळ क्षेत्रातील तांत्रिक आणि प्रशासकीय बाजूंची सखोल माहिती दिली. २०१५ मध्ये कोल्हापूरचे मुख्य पंच आजारी पडल्याने त्यांना कॉम्प्युटर हाताळणीसाठी मिळालेली संधी त्यांच्या आयुष्यातील वळणबिंदू ठरली. त्यानंतर त्यांनी नाशिक येथे राष्ट्रीय पंच परीक्षा दिली आणि २०१८ मध्ये दिल्ली येथील कॉमनवेल्थ गेम्स दरम्यान झालेल्या परीक्षेत देशात प्रथम येत सर्वात तरुण ‘आंतरराष्ट्रीय पंच’ होण्याचा मान पटकावला. फिडे (FIDE) या जागतिक संघटनेच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना त्यांनी रेटिंगची गणितं, खेळाडूंची क्षमता आणि खेळातील शिस्तीचे महत्त्व विषद केले. विशेषतः तामिळनाडू येथे झालेल्या ऐतिहासिक बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या कोअर कमिटीत त्यांनी बजावलेली भूमिका आणि २००० खेळाडूंच्या व्यवस्थापनाचा अनुभव त्यांनी अत्यंत रंजकपणे मांडला.
इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा उपयोग बुद्धिबळ क्षेत्रातील ब्रॉडकास्टिंग आणि तांत्रिक बाबींमध्ये कसा झाला, याचे उदाहरण देताना त्यांनी कतार आणि गोवा येथील स्पर्धांच्या आठवणी सांगितल्या. २०१९ मध्ये स्थिर नोकरी सोडून पूर्णवेळ बुद्धिबळ क्षेत्रात येण्याचा धाडसी निर्णय घेताना कुटुंबाने दिलेल्या समर्थनाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. गॅरी कॅस्पारोव्ह आणि विश्वनाथन आनंद यांच्यासारख्या दिग्गजांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी सध्या मुकुल माधव विद्यालय आणि परदेशातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून देत असलेल्या प्रशिक्षणाची माहिती दिली. बुद्धिबळ केवळ एक खेळ नसून ती एक मोठी इंडस्ट्री आहे, ज्यात फोटोग्राफीपासून ते ग्राफिक डिझाइनपर्यंत अनेक करिअर संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सोहनी यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना बुद्धिबळाचे क्लासिकल, रॅपिड, ब्लिटझ आणि बुलेट हे प्रकार समजावून सांगितले. मुलांनी केवळ ओपनिंग्सवर भर न देता मिडल गेम आणि एंड गेमवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. बुद्धिबळामुळे चिकाटी, संयम आणि निर्णयक्षमता वाढते, जी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडते, असे ते म्हणाले. या यशस्वी वाटचालीत आई, बाबा, पत्नी आणि सासरच्या मंडळींसह जिल्हा व राज्य बुद्धिबळ संघटनेचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी विवेक सोहनी यांचे वडील श्री. सोहनी सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आणि एका प्रेरणादायी मुलाखतीची सांगता झाली.







