GRAMIN SEARCH BANNER

शालेय रेखाकला परीक्षेत करबुडेचा श्रेयस जाधव राज्यस्तरावर चमकला

Gramin Varta
43 Views

रत्नागिरी : राज्य शासनाच्या कला संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या शालेय रेखाकला (ड्रॉईंग ग्रेड) एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेत सेंट थॉमस शाळेचा विद्यार्थी व करबुडे गावचा सुपुत्र श्रेयस संतोष जाधव याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डिझाईन प्रकारात त्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला असून राज्य गुणवत्ता यादीत 21 वे स्थान मिळवण्याचा मानही त्याने मिळवला आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून सहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामधून रत्नागिरी जिल्ह्यातील श्रेयसची निवड झाल्याने सर्वत्र कौतुकाचा सूर उमटत आहे.

इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेसाठी सेंट थॉमस शाळेतील एकूण 42 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विशेष बाब म्हणजे या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. याच परीक्षेत श्रेयस जाधव याने राज्य गुणवत्ता यादीत 21 वे स्थान मिळवत शाळेच्या यशात मोलाची भर घातली. तसेच डिझाईन विषयात राज्यात तृतीय क्रमांक पटकावत त्याने आपली कलात्मक गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याचप्रमाणे एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेला प्रविष्ट झालेल्या 30 पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या परीक्षेचाही निकाल शंभर टक्के लागला आहे.

श्रेयसला लहानपणापासूनच चित्रकलेची विशेष आवड असून विविध ठिकाणी त्याने आपल्या कलाकृती सादर केल्या आहेत. अनेक शालेय स्पर्धांमध्ये सहभागी होत त्याने बक्षिसेही पटकावली आहेत.त्याच्यातील चित्रकलेची आवड आणि गुणवत्ता ओळखून शिक्षकांनी त्याला या स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले होते. श्रेयसच्या या यशामुळे शाळेतील विद्यार्थी राज्यस्तरावर झळकल्याचा आनंद व्यक्त केला जात असून करबुडे गावातही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या यशाबद्दल शाळेचे मॅनेजर फादर थॉमस, मुख्याध्यापक फादर जॉर्ज, मार्गदर्शक कलाशिक्षक राहुल कळंबटे सर, शिक्षिका नेहा कांबळी मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी विशेषतः श्रेयस जाधव याचे मनापासून अभिनंदन केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कला शिक्षणातील सातत्य, योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Total Visitor Counter

3200134
Share This Article