GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-गोवा महामार्गाचे काम मे अखेर पूर्ण होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

Gramin Varta
57 Views

सिंधुदुर्ग: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि कोकणवासीयांच्या संयमाची परीक्षा पाहणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा केली आहे. येत्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल आणि यंदाचा पावसाळा प्रवाशांसाठी सुखकर असेल, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या नितीन गडकरी यांनी यावेळी महामार्गाच्या कामाला झालेल्या विलंबाबाबत खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, या रस्त्याच्या कामामुळे झालेली बदनामी मी स्वीकारतो, परंतु मी राजकारणात कधीही खोटे बोलत नाही. नारायण राणे शब्दाचे पक्के आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीत मी हा शब्द देतो की, मे महिना संपण्यापूर्वी या महामार्गाचे काम पूर्णत्वास जाईल. काम पूर्ण झाल्यानंतर आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबई ते गोवा असा रस्ते प्रवास करून कामाची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. या महामार्गामुळे कोकणातील पर्यटनाला नवी गती मिळेल आणि प्रवाशांचा वेळ व इंधनाची मोठी बचत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई-गोवा महामार्गासोबतच गडकरी यांनी कोकणला जोडणाऱ्या कोल्हापूर-रत्नागिरी या दुसऱ्या महत्त्वाच्या मार्गाबाबतही मोठी अपडेट दिली. या मार्गाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम आणि बोगद्याचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. हे दोन्ही मार्ग पूर्ण झाल्यास कोकणच्या दळणवळणात क्रांती होईल, असे गडकरी यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, आमदार नितेश राणे, निलेश राणे, दीपक केसरकर आणि प्रसाद लाड यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती. गडकरींच्या या घोषणेमुळे कोकणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आता पावसाळ्यापूर्वी खरोखरच हा मार्ग पूर्ण होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3287176
Share This Article