GRAMIN SEARCH BANNER

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! लाडक्या बहिणींना १४ जानेवारीपूर्वी मिळणार ४५०० रुपये

Gramin Varta
467 Views

मुंबई: सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरु असून डिसेंबरअखेर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार आहे. आता मकर संक्रातीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते म्हणजेच ४५०० रुपये मिळणार आहेत.

त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे. तसेच मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते (३००० रुपये) देण्याचेही नियोजन सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंतच्या मुदतीत अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले होते. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख नऊ हजार महिला होत्या. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी सर्व अर्जांची पडताळणी अशक्य होती. त्यामुळे कागदपत्रांच्या आधारावर पात्र लाडक्या बहिणींना सुरवातीला लाभ देण्यात आला. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यासाठी दरमहा १६६ कोटी ३५ लाखांचा निधी लागत होता. निकषांनुसार झालेल्या पडताळणीत सोलापूर शहर-जिल्ह्यातील दोन लाख लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा लाभ ३० कोटींनी कमी झाला आहे.

एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी, २१ पेक्षा कमी आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला, सरकारी नोकरदार लाभार्थी, पुरुष लाभार्थी, चारचाकी वाहने असलेल्या महिला, केंद्र व राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील लाभार्थी या सर्वांचा लाभ बंद करण्यात आला. त्यात संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी होत्या. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दरमहा १५०० ऐवजी ५०० रुपये दिले जात आहेत. ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासून पुढे प्रत्येक महिन्याच्या १० ते १५ तारखेपूर्वी (वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत) लाभ दिला जाणार आहे.

ई-केवायसीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र आता सुरू असणाऱ्या महापालिका निवडणुका आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी एक महिन्याची मुदतवाढ मिळू शकते.

मुदतीत ई-केवायसी करावीच लागेल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींसाठी निधी उपलब्ध झाला आहे. नोव्हेंबर महिन्याचा लाभ त्यांना तीन-चार दिवसांत वितरित होईल. परंतु, लाडक्या बहिणींनी ३१ डिसेंबरपर्यंतच्या मुदतीत ‘ई-केवायसी’ करून घ्यावी. फेब्रुवारीपासून ई-केवायसी केलेल्या पात्र लाभार्थींचाच लाभ पुढे नियमित सुरू राहील.

Total Visitor Counter

3376188
Share This Article