GRAMIN SEARCH BANNER

नागपूर युवा संसद अधिवेशनात राजापूरच्या सिद्धेश कोरगावकरची छाप

Gramin Varta
52 Views

राजापूर/ तुषार पाचलकर: नागपूर येथील विधानभवन येथे ‘स्वराज यूथ फोरम’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा संसद अधिवेशनात राजापूर तालुक्यातील सावडाव गावचा सुपुत्र सिद्धेश कोरगावकर याने आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुंबईस्थित असलेल्या सिद्धेशने या अधिवेशनात प्रत्यक्ष संसदीय कामकाज, कायदेनिर्मितीची प्रक्रिया आणि संविधानातील अनुच्छेद १०५ अंतर्गत येणाऱ्या संसदीय विशेषाधिकारांवर अतिशय प्रभावीपणे भाष्य केले. एखाद्या प्रस्थापित लोकप्रतिनिधीप्रमाणे त्याने विषयाची केलेली मांडणी आणि संसदीय शिष्टाचाराचे पालन करत केलेली उत्कृष्ट कामगिरी उपस्थित मान्यवरांच्या पसंतीस उतरली. सदृढ लोकशाहीच्या जडणघडणीसाठी आणि भविष्यातील सक्षम राजकारणासाठी युवा संसदेच्या माध्यमातून असे नेतृत्व पुढे येणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

सिद्धेश कोरगावकर याच्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल भाजप नेते तथा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत राज्यस्तरीय ‘दिशा’ समितीचे सदस्य संतोष गांगण यांनी त्याचे विशेष अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सध्याच्या काळात राजकारणाचा दर्जा खालावत असल्याची टीका होत असताना, सिद्धेशसारख्या तरुणाने अशा वैचारिक व्यासपीठावर सक्रिय सहभाग घेऊन तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या या यशाबद्दल आणि संसद अधिवेशनातील चमकदार कामगिरीबद्दल राजापूर तालुक्यासह कोकणातील विविध स्तरांतून त्याचे भरभरून कौतुक केले जात आहे.

Total Visitor Counter

3379612
Share This Article