GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात बेशिस्त पार्किंगला पोलिसांचा चाप; लांजा, खेड अन् सावर्डे येथील चार वाहनधारकांवर गुन्हे दाखल

Gramin Varta
12 Views

रत्नागिरी:  रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक रस्त्यांवर आणि बाजारपेठेच्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या बेशिस्त चालकांविरुद्ध पोलिसांनी आता कडक मोहीम उघडली आहे. १७ मार्च रोजी जिल्हयातील लांजा, खेड आणि सावर्डे परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार वेगवेगळ्या वाहन चालकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लांजा बाजारपेठेत मुंबई-गोवा हायवेवर सोसायटी क्लोथ सेंटरसमोर आपली मोटारसायकल (क्रमांक MH 08 BH 9765) धोकादायक स्थितीत उभी केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किशोर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इस्माईल सुबानी झारी याच्यावर पहिली कारवाई करण्यात आली.

लांजा परिसरातच दुसरी कारवाई महालक्ष्मी भेळपुरी दुकानासमोर करण्यात आली, जिथे आपला महिंद्रा मॅक्झिमो टेम्पो (क्रमांक MH 08 W 4462) रस्त्याच्या मध्यभागी उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चालक दिनेश बिरा कोलापटे याच्यावर पोलीस कॉन्स्टेबल सुजाता महाडिक यांनी गुन्हा दाखल केला आहे.

अशाच प्रकारची कारवाई खेड बाजारपेठेतही पाहायला मिळाली, जिथे ‘आपला बाजार’ समोरील गांधी चौक परिसरात गणेश मारुती महाडीक याने आपली गाडी (क्रमांक MH 06 BW 9804) पादचाऱ्यांना आणि इतर वाहनांना धोका होईल अशा स्थितीत उभी केली होती. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई तेजस्विनी जाधव यांनी फिर्याद दिल्यानंतर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, चिपळूण तालुक्यातील सावर्डे ते वहाळ जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर प्रवाशांची वाहतूक करणारी मॅक्स गाडी (क्रमांक MH 11 Y 4192) रस्त्याच्या कडेला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केल्याबद्दल चालक संतोष विठोबा भिगार्डे याच्यावर पोलीस हवालदार सतीश कदम यांनी कारवाई केली आहे. सार्वजनिक रस्त्यांवर शिस्त पाळली जावी आणि अपघातांना निमंत्रण देणारी अनधिकृत पार्किंग रोखली जावी, या उद्देशाने पोलिसांनी ही धडक कारवाई केली असून यामुळे बेशिस्त वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.

Total Visitor Counter

3388102
Share This Article