मुंबई: एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला. या विरोधात महाराष्ट्रातील शाही घराण्यांचे वंशज आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
नागपूरच्या भोसले राजघराण्याचे वर्तमान वंशज मुधोजीराजे भोसले यांनी सुरुवातीपासूनच या विषयाबाबत आक्रमक भूमिका घेत हे प्रकरण लावून धरलं होतं. यात आता जिजाऊ घराण्याचे शिवाजी दत्तात्रय राजे जाधव आणि रायगडचे रघोजीराजे शाहाजीराजे आंग्रे, साताऱ्याच्या शाही घराण्याशी संबंधित राजे मुधोजीराजे अजितसिंहराव भोसले याचिकाकर्ते असून यांच्या वतीने ॲड. आशिष गायकवाड यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.
जुलै 2025 मध्ये एनसीईआरटीने इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या ‘Exploring Society : India and Beyond Part-I’ या पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित केली होती. या पुस्तकाच्या 71 व्या पानावर ‘मराठा साम्राज्य’ दर्शवणारा नकाशा होता. या नकाशामध्ये 1759 च्या काळातील मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवण्यात आला होता. दक्षिणेत तंजावूरपासून उत्तरेत पेशावरपर्यंत आणि पूर्वेला कटकपर्यंत मराठा साम्राज्य पसरल्याचं त्यात दर्शवण्यात आलं होतं. याचिकाकर्त्यांचा आरोप आहे की, राजस्थानातील काही शाही घराणी आणि काही राजकीय नेत्यांनी या नकाशावर आक्षेप घेतल्यानंतर NCERT ने घाईघाईने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली. मात्र, या समितीने कोणतीही ऐतिहासिक पडताळणी न करता आणि कोणतीही सार्वजनिक सूचना न देता डिजिटल आवृत्तीतून हा नकाशा हिंदी, इंग्रजी आणि उर्दू आवृत्त्यांमधून हटवला, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचं म्हणणं आहे की, हा निर्णय मनमानी पद्धतीने घेण्यात आला असून तो विद्यार्थ्यांच्या अचूक इतिहास जाणून घेण्याच्या अधिकारावर आणि सांस्कृतिक ओळखीवर आघात करणारा आहे.
याचिकेमध्ये राजे मुधोजी महाराज भोंसले (नागपूर), शिवाजीराजे जाधव (सिंदखेडराजा), श्रृषीकेश निकम पाटील (छत्रपती संभाजीनगर), रघुजीराजे आंग्रे (अलिबाग), रविंद्र पडवळ (पुणे), कुणाल मालुसरे (पुणे), राम नारायण मराठा, पानीपत (हरीयाणा), शरद मोडे (बीड), अर्थव मारणे (पुणे) आदींचा समावेश आहे.







