रत्नागिरी : शहराच्या मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या मारुती मंदिर सर्कल परिसराचा ‘स्मार्ट सिटी’च्या धर्तीवर लवकरच कायापालट होणार आहे. शहराचे सौंदर्य वाढवण्याबरोबरच पर्यटनाला चालना देण्यासाठी या सर्कलचा रस्ता परिसर आता आधुनिक आणि आकर्षक अशा ‘ग्लोबल स्टोन’ने विकसित केला जाणार आहे. नामांकित खासगी कंपनीच्या माध्यमातून या विशेष प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
आतापर्यंत डांबरी आणि काँक्रीटचे रस्ते शहरात पाहायला मिळाले आहेत; मात्र परदेशातील रस्त्यांच्या धर्तीवर ‘ग्लोबल स्टोन’चा वापर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच केला जाणार आहे. पेव्हर ब्लॉकपेक्षा अधिक टिकाऊ आणि सौंदर्यदृष्ट्या आकर्षक असलेले हे स्टोन बसवण्यासाठी सध्या येथील जुना डांबरी रस्ता उखडण्याचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर हा परिसर नव्या स्वरूपात शहरवासीयांबरोबरच पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज होणार आहे.
एसटी स्टँड, नाचणे रोड, साळवी स्टॉप आणि मजगाव रोड हे प्रमुख रस्ते काँक्रीटचे झाले असले तरी, मारुती मंदिर सर्कल अद्याप डांबरी असल्याने पावसाळ्यात येथे वारंवार खड्डे पडत होते. पाण्याचा निचरा योग्य न झाल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता वाढत होती. मात्र ‘ग्लोबल स्टोन’च्या वापरामुळे पाणी साचण्याची समस्या कमी होऊन रस्ता अधिक मजबूत, सुरक्षित आणि देखणा होणार आहे.
या प्रकल्पात केवळ रस्त्याचेच नव्हे, तर संपूर्ण परिसराच्या सुशोभीकरणाचाही समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याच्या दृष्टीने पार्किंगच्या जागेत सुसज्ज बाके व बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र आणि शिस्तबद्ध पार्किंग झोन विकसित केला जाणार असून, पर्यटकांसाठी आवश्यक नागरी सुविधाही येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
शहराचा हा मुख्य भाग ‘हायटेक’ स्वरूपात विकसित झाल्यानंतर मारुती मंदिर परिसराला रत्नागिरीच्या पर्यटन नकाशावर नवी ओळख मिळेल. भविष्यात हा परिसर केवळ वाहतूक सर्कल न राहता, शहराच्या आकर्षणाचे एक महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मारुती मंदिर सर्कलचा ‘स्मार्ट’ कायापालट ; रत्नागिरीत पहिलाच ‘ग्लोबल स्टोन’ रस्ता; पर्यटनाला नवी चालना






