GRAMIN SEARCH BANNER

देवरूख महाविद्यालयात ‘आदर्श ग्रंथालय वापरकर्ता पुरस्कार- २०२६’ ने शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव

Gramin Varta
29 Views

देवरूख (प्रतिनिधी): देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख येथे ग्रंथालयाचा नियमित व प्रभावी वापर करणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा ‘आदर्श ग्रंथालय वापरकर्ता पुरस्कार- २०२६’ प्रदान करून गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर व्हावा आणि ज्ञानार्जनाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम गेली अनेक वर्ष प्रत्येक शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्यावतीने राबविण्यात येत असल्याची माहिती ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी दिली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील ‘आदर्श ग्रंथालय वापरकर्ता पुरस्कार’ प्राप्त शिक्षक व विद्यार्थी पुढील प्रमाणे:- शिक्षक गट: प्रा. सुहानी सावंत. विद्यार्थी गट: ऋतुजा रमेश पवार (द्वितीय वर्ष, वाणिज्य), अफान अजमेर धामस्कर (द्वितीय वर्ष, संगणक विज्ञान) आणि किरण चंद्रकांत टक्के (तृतीय वर्ष, वाणिज्य). या पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा नियमित, शिस्तबद्ध व जिज्ञासेने वापर करून इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. या पुरस्कारासाठी ग्रंथालय सेवांचा नियमित वापर, विविध साहित्य विषयक स्पर्धेतील सहभाग, ग्रंथालय आयोजित उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, डिजिटल व मुद्रित साधनांचा योग्य वापर तसेच ग्रंथालय नियमांचे पालन या निकषांचा पुरस्काराकरिता विचार करण्यात आल्याचे ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी सांगितले.

पुरस्काराच्या स्वरूपात विजेत्या शिक्षक व विद्यार्थ्यांना, पुस्तके, प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रा. विकास शृंगारे यांनी आपले वडील स्व. प्रभाकर शृंगारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिके देऊन या उपक्रमाला विशेष प्रेरणादायी स्वरूप दिले. उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रंथालय हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाचे केंद्र असून, त्याचा अधिकाधिक उपयोग केल्यास ज्ञानाची व्याप्ती वाढते. यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले. डॉ. वर्षा फाटक यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचनामुळे भाषेची समृद्धी, विचारांची स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढत असल्याचे स्पष्ट करून, अभ्यासाबरोबरच कायम अवांतर वाचन करण्याविषयी आग्रही मत व्यक्त केले.

ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी आपल्या आभार प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील विविध पुस्तके, संदर्भ ग्रंथ आणि माहिती स्त्रोतांचा अधिकाधिक उपयोग करून वाचनसंस्कृती बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला प्रा. अजित जाधव व प्रा. डॉ. सुनील सोनवणे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक स्वप्निल कांगणे व रोशन गोरुले यांनी मेहनत घेतली. या उपक्रमाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी आयोजकांचे कौतुक करून यशस्वी शिक्षक व विद्यार्थ्यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Total Visitor Counter

3366944
Share This Article