GRAMIN SEARCH BANNER

बिबट्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी पाचलमध्ये विद्यार्थ्यानी बनवले ‘सौर बुजगावणे’

Gramin Varta
854 Views

उपक्रमशील शिक्षक सत्यनारायण देसाई यांचा पर्यावरणपूरक प्रयोग

तुषार पाचलकर / राजापूर : तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, या संकटावर उपाय शोधण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना सुरू आहेत. अशा परिस्थितीत पाचल येथील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील उपक्रमशील शिक्षक सत्यनारायण देसाई आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले ‘सौर बुजगावणे’ हे अभिनव मॉडेल विशेष लक्ष वेधून घेत आहे.

मानवी वस्ती आणि शेतशिवाराच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरणारे हे सौर बुजगावणे गोल फिरणारे असून, ते एका जागेवर स्थिर राहत नाही. रात्रीच्या वेळी कार्यरत होणाऱ्या या यंत्राच्या हातावर व डोक्यावर बसवण्यात आलेल्या बॅटरीमधून आजूबाजूच्या परिसरात तीव्र प्रकाश पडतो. या प्रकाशामुळे बिबट्या तसेच इतर वन्यप्राणी त्या भागात येण्यास टाळाटाळ करतात.

या बुजगावण्याला एलडीआर सेन्सर व मोशन सेन्सर जोडण्यात आले आहेत. वाडी-वस्ती अथवा चार-पाच घरांच्या परिसरात हे यंत्र बसवले असता, अंधार पडताच संपूर्ण सर्किट आपोआप कार्यरत होते. परिसरात ठिकठिकाणी लाईट पेटत राहतात आणि आवाज निर्माण होतो, त्यामुळे वन्यप्राणी घाबरून मानवी वस्तीपासून दूर राहतात.

याशिवाय, परिसरात बिबट्या किंवा अन्य वन्यप्राणी दाखल झाल्यास मोशन सेन्सर सक्रिय होतो. त्याला जोडलेला लाल तिखट किंवा मिरची वापरलेला छोटा फटाका फुटल्याने परिसरात तीव्र वास पसरतो. हा वास जंगली श्वापदांना सहन न होणारा असल्याने ते पुन्हा त्या ठिकाणी येण्याची शक्यता कमी होते.

पर्यावरणपूरक, कमी खर्चिक आणि कोणतीही इजा न करणारी उपाययोजना म्हणून हे सौर बुजगावणे विकसित करण्यात आले आहे. सौर ऊर्जेवर चालणारे हे यंत्र टिकाऊ असून शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरणार आहे. सत्यनारायण देसाई यांनी यापूर्वीही पर्यावरणपूरक व समाजोपयोगी विज्ञान प्रतिकृती तयार केल्या असून, त्यांच्या अनेक मॉडेल्सची गेल्या दहा वर्षांत राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. त्यामध्ये त्यांनी तीन वेळा राज्यस्तरावर क्रमांकही पटकावला आहे.

बिबट्यांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पाचलमध्ये साकारलेले हे ‘सौर बुजगावणे’ ग्रामीण भागासाठी एक प्रभावी आणि आश्वासक उपाय ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3380017
Share This Article