पोलिस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपज्योती पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांनी केले कौतुक
तुषार पाचलकर / राजापूर
माणुसकीची भावना जोपासत संकटात सापडलेल्या वृद्ध महिलेला मदतीचा हात देणाऱ्या रिक्षाचालक इब्राहीम खलिफे यांचा राजापूर पोलिसांनी शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यांच्या या कार्यतत्परतेचे व संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटना दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता मुंबई–गोवा महामार्गावरील गंगातीर्थ हॉटेलजवळ घडली. सौ. रश्मी प्रभाकर चव्हाण (वय ६५, रा. कोदवली तरळवाडी, ता. राजापूर) या वृद्ध महिलेला एका अज्ञात कारचालकाने मारहाण करून जखमी केले व घटनास्थळावरून पसार झाला.
त्याच वेळी राजापूर शहरातील रिक्षाचालक इब्राहीम खलिफे हे महामार्गावरून जात असताना त्यांनी हा प्रसंग पाहिला. मानवीतेच्या भावनेतून त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता रिक्षा थांबवली आणि जखमी महिलेला तातडीने आपल्या रिक्षेतून ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे उपचारासाठी दाखल केले.
इब्राहीम खलिफे यांच्या या माणुसकीपूर्ण कार्याची दखल घेत राजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपज्योती पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांनी त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान केला.
पोलिसांनी सांगितले की, महामार्गावर किंवा परिसरात अपघात अथवा अनुचित प्रकार घडल्यास नागरिकांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात द्यावा, हीच खरी समाजसेवा आहे.
इब्राहीम खलिफे यांनी दाखवलेली माणुसकीची भावना ही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.