रत्नागिरी : दि. २३ सप्टेंबर, २०२५ – कर्तव्य, शौर्य आणि कलेचा संगम साधत रत्नागिरी पोलीस दलाने पुन्हा एकदा आपली ओळख निर्माण केली आहे. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या २० व्या महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळावा-२०२५ मध्ये, रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस हवालदार अमोल अरुण गमरे यांनी ‘पोलीस फोटोग्राफी’ स्पर्धेत कांस्यपदक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
दिनांक १५ ते १९ सप्टेंबर, २०२५ दरम्यान राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक-२, पुणे येथे आयोजित या प्रतिष्ठेच्या मेळाव्यात, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पोलीस अंमलदार यांनी विविध स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दाखवले. यामध्ये विशेष आकर्षण ठरलेल्या ‘पोलीस फोटोग्राफी’ या स्पर्धा प्रकारात तब्बल ४४ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. या तीव्र स्पर्धेत रत्नागिरी पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करताना पोलीस हवालदार/१२६५ अमोल अरुण गमरे, नेमणूक जिल्हा विशेष शाखा, यांनी आपल्या कलेची छाप पाडली.
आपल्या उत्कृष्ट छायाचित्रणातून अमोल गमरे यांनी केवळ सहभागच घेतला नाही, तर कांस्य पदक आणि प्रमाणपत्र मिळवून रत्नागिरी पोलीस दलासाठी एक नवा अध्याय लिहिला. त्यांच्या या यशामुळे कोकण परिक्षेत्रातील पोलिसांची मान उंचावली आहे.
गमरे यांच्या या लक्षवेधी कामगिरीबद्दल त्यांचे विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, श्री. संजय दराडे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, आज दिनांक २२ सप्टेंबर, २०२५ रोजी पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी स्वतः पोलीस हवालदार अमोल गमरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. बी. बी. महामुनी, पोलीस उपअधीक्षक (मुख्या.) श्रीमती. राधिका फडके आणि पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा श्री. नितीन ढेरे यांनी देखील त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कला आणि कर्तव्य यांची सांगड घालून मिळालेले हे यश निश्चितच कौतुकास्पद असून, पोलीस दलातील इतर कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल.