GRAMIN SEARCH BANNER

खून प्रकरणात धक्कादायक माहिती : तरुणी गरोदर राहिल्याने प्रियकराने स्वतःच्या बारमध्ये केबलने गळा आवळून केला खून

Gramin Varta
123 Views

ठरलेल्या लग्नात अडसर नको म्हणून प्रेयसीला कायमचे संपवले

रत्नागिरी (प्रतिनिधी) – रत्नागिरी शहराला हादरवून सोडणाऱ्या खून प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रेयसी गर्भवती असल्याने आणि त्याच्या दुसऱ्या ठरलेल्या लग्नात अडसर ठरत असल्याने हैवान झालेल्या तिच्या प्रियकरानेच साथीदारांच्या मदतीने निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह आंबा घाटात फेकून देण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.

मिरजोळे येथील रहिवासी भक्ती जितेंद्र मयेकर (वय २६) हिचे दुर्वास दर्शन पाटील (वय २५, रा. जंगमवाडी, वाटद खंडाळा) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधातून भक्ती गरोदर राहिली आणि तिने दुर्वासकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, दुर्वासने आधीच दुसऱ्या मुलीशी लग्नाचे ठरवले होते. त्यामुळे, भक्ती त्याच्या लग्नात अडथळा ठरू नये म्हणून त्याने तिला संपवण्याचा क्रूर कट रचला.

या कटात दुर्वासने त्याचे साथीदार विश्वास विजय पवार (वय ४१, रा. बौद्धवाडी,कळझोंडी) आणि सुशांत शांताराम नरळकर (वय ४०, रा. वाटद खंडाळा) यांना सामील करून घेतले. १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास भक्ती मिरजोळे येथील घरातून रत्नागिरीतील प्रशांत नगर येथील आपल्या भाड्याच्या खोलीवर जात असल्याचे सांगून निघाली. त्यानंतर दुर्वासने तिला फोन करून खंडाळा येथे त्याच्या मालकीच्या ‘सायली देशी बार’ मध्ये बोलावले.

रचलेल्या कटनुसार, दुर्वास आणि विश्वास यांनी बारच्या वरच्या खोलीत भक्तीचा केबलने गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी सुशांत नरळकर याच्या वॅगनआर गाडीतून मृतदेह आंब्याघाटात नेण्यात आला आणि घाटाच्या निर्जन भागात फेकून देण्यात आला.

भक्तीचा फोन बंद असल्यामुळे आणि ती परत न आल्याने तिच्या कुटुंबियांना शंका आली. तिचा भाऊ हेमंत मयेकर यांनी शोध घेतला, मात्र ती कुठेही सापडली नाही. अखेर त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, भक्ती आणि आरोपी दुर्वास पाटील यांच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. पोलिसांनी दुर्वास पाटीलची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

या कबुलीनंतर पोलिसांनी दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि सुशांत नरळकर या तिघांनाही भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह परिसरात संतापाची आणि हळहळची लाट पसरली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

असा आहे घटनाक्रम :

शनिवारी दोन वाजता सहकारी आरोपींना घेऊन रत्नागिरी व देवरूख पोलीसांचे पथक घाटात दाखल झाले.आंब्यातील अपघात मदत पथकातील पंधरा तरूणांना पोलीसांनी पाचारण करून दरीतील मृतदेहाचा शोध घेतला. व पथकाने दरीत उतरण्यास वाट तयार करून घेतली.

तीन तासानंतर उपविभागीय पोलिस अधीक्षक निलेश माईनकर, विवेक पाटील, मुख्य आरोपीस घेऊन घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह काढण्यास सव्वा पाचला मदत पथक दरीत उतरू लागले.सायंकाळ होवू लागल्याने दरीत धुके दाटले होते.पावसाची रिपरिप चालूच होती.तीन दोरखंड गाडीच्या चाकाला बांधून त्याच्या सहाय्याने सहा तरूण घसरतच दरीत उतरले.वीस मिनिटांत मृतदेह प्लस्टिक मध्ये बंदिस्त करून रस्तावर आणला गेला. दरीत खाली साठ फूट खोल झाडीत मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला.

फिर्यादी व आरोपी व साक्षिदार यांच्या समक्ष मृतदेहाची ओळख पटवली. अंगावरील गुलाबी नक्षीकाम ड्रेस व हातावरील टॅटू वरून भाऊ हेमंत याने भक्ती बहीणाची ओळख पटवली. साडेसहानंतर साखरपा येथे आरोग्य ‌केंद्रात शवविच्छेदनास मृतदेह नेला.

बारा दिवसापूर्वीचा मृतदेह असल्याने चेहरा सडून कवटी शिल्लक राहीली होती. सतत पाऊस असल्याने दुर्गंधी पसरलेली नव्हती. आंबा गावातील मदत पथक सरसावले आंबा घाटात अपघात असो की अन्य गुन्हेगारी घटना असो.पोलीस अधिकारी येथील पथकातील विजय पाटील, दिनेश कांबळे, दिनेश गवरे,दिपक भोसले,सागर चाळके,व्दिग्वीज गुरव,शंकर डाकरे यांचेसह पंधरा तरूणांनी मृतदेह दरीतून वर घेण्यास योगदान दिले.

उपविभागीय पोलिस अधीक्षक निलेश माईनकर,विवेक पाटील, ,एल.सी.बी.पोलीस निरीक्षक नितीन ढेरे,देवरूख पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, डी.वाय.एस.पी.सुरेश कदम‌ . हवालदार सचिन कामेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

भक्ती व दुर्वास यांचे दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. गरोदर राहील्याने तीने लग्नाचा हट्ट धरला पण त्याने विरोध केला. प्रेयसी ऐकत नाही हे पाहता आपल्या जिवनातील अडथळा दूर करण्यासाठी तिचा खून करून तिचा मृतदेह रत्नागिरी पासून सत्तर‌ किलोमिटरवरील गायमुख जवळील दरीत फेकून दिला.तिच्या खूनानंतर दोन दिवसांत त्याने दुसऱ्या मुलीशी साखरपुडा केल्याची संतापजनक बाब मयेकर कुटूबियांकडून समजली.

दुर्वास पाटील मूळचा कोल्हापूरचा

दुर्वास पाटील मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे.त्याच्या मालकीचे खंडाळा येथे बार व दारूचे दुकान आहे.दहा महिन्यांपूर्वी खंडाळा येथील तरूण बेपत्ता आहे.त्याचाही खून करून याच दरीत फेकल्याचे तपासात पुढे आले आहे.त्याचाही तपास करण्याचे ठरले होते पण धुके व अंधार पडू लागल्याने हा तपास पुढे ढकलण्यात आला.

Total Visitor Counter

2648121
Share This Article