लांजा : तालुक्यातील रूण पराडकरवाडी येथून चोरीला गेलेला ३ लाख ५५ हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल पोलिसांनी मुंबईतून हस्तगत केला असून, एका प्रकरणाचा छडा लावताना दुसरी चोरीही उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी ऋषिकेश अंकुश पराडकर (वय २७) याला अटक केली आहे.
प्रणय संजय पराडकर (वय २५, रा. रूण पराडकरवाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, शेजारी राहणाऱ्या ऋषिकेश पराडकर याने त्यांच्या घराचे कुलूप चावीने उघडून कपाटातील लॉकरमधून सुमारे ४५ हजार रुपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरून नेली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
त्यानंतर दुसऱ्या शेजाऱ्यांनीही तक्रार नोंदवली की, त्यांच्या घरातूनही सोन्याची गंठण चोरीला गेली असून संशयित ऋषिकेश पराडकर त्यांच्या घरी येत-जात होता. तपासादरम्यान त्याने दोन्ही चोरीची कबुली दिली.
पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल नासिर नावळेकर, विलास जाधव आणि कॉन्स्टेबल नितेश आर्डे यांनी ६ ऑगस्ट रोजी मुंबई सांताक्रूझ येथे जाऊन ७ ऑगस्ट रोजी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणात लांजा पोलिसांनी काही दिवसांतच चोरीचा छडा लावल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
लांज्यातील सोन्याची चोरी उघडकीस; मुंबईतून ३ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
