GRAMIN SEARCH BANNER

खेडशी–डफळचोळ वाडीत मध्यरात्री पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ!

Gramin Varta
139 Views

रत्नागिरी : रत्नागिरीजवळील खेडशी येथील डफळचोळ वाडी परिसरात बिबट्याचा उपद्रव पुन्हा एकदा वाढला असून, शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) मध्यरात्री बिबट्या खुलेआम वाडीत फिरताना ग्रामस्थांच्या नजरेस पडला. या घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तसेच काही ग्रामस्थांच्या मोबाईलमध्ये स्पष्टपणे कैद झाले आहे.

या घटनेमुळे वाडीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याने एका घरासमोरून कुत्रा उचलून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी बिबट्याचा वावर दिसल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.

डफळचोळ वाडी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून या बिबट्याचा सतत वावर असून, तो रात्रीच्या वेळी वस्तीत शिरत असल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना आणि लहान मुलांना बाहेर जाणे धोक्याचे ठरत असून, जनावरेही सतत भीतीत आहेत.

ग्रामस्थांनी अनेक वेळा वनविभागाला याबाबत कळवले असले, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “बिबट्याचा त्रास वाढत असताना वनविभागाच्या हालचाली दिसत नाहीत. मोठी दुर्घटना झाल्यावरच उपाययोजना करणार का?” असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

बिबट्याला तातडीने पकडून सुरक्षित स्थळी हलवावे, तसेच रात्रीच्या गस्तीसाठी पथक नेमावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3366871
Share This Article