रत्नागिरी: न्यायालयाने नियुक्त केलेल्या कोर्ट कमिशनद्वारे पंजाब नॅशनल बँकेला कायदेशीर ताबा मिळालेल्या घराचे सील तोडून त्यात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी कुवारबाव येथील एका व्यक्तीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ सप्टेंबर २०२५ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली असून, याप्रकरणी १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री उशिरा तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुवारबाव येथील भूमापन क्रमांक २३/३/१३१ मधील ३०० चौरस मीटर क्षेत्रात असलेले ग्रामपंचायत घर क्रमांक ४/३३५ (क्षेत्र २६०० चौरस फूट) ही मिळकत पंजाब नॅशनल बँकेच्या रत्नागिरी शाखेकडे गहाण होती.
कर्ज थकबाकीमुळे मे. न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्ट कमिशनमार्फत या घराचा कायदेशीर ताबा बँकेला देण्यात आला होता. बँकेने या मिळकतीला लाखेचे सील लावून कायदेशीररीत्या कुलूप लावले होते. मात्र, आरोपी अजित राजाराम मतसागर (रा. कुवारबाव, रत्नागिरी) याने बँकेची किंवा न्यायालयाची कोणतीही पूर्वसंमती न घेता, लावलेले सील आणि कुलूप तोडून घरात बेकायदेशीररीत्या प्रवेश केला व जागेवर अतिक्रमण केले.
या प्रकरणी बँकेचे प्रतिनिधी विश्वास सत्यनारायणाराव आंचलकर (वय ३५, रा. शंखेश्वर कॉम्प्लेक्स, आरोग्य मंदिर, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अजित मतसागर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३२९(४), ३२४(२) आणि २२३ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कोर्ट कमिशनच्या आदेशाचे उल्लंघन करून बँकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
रत्नागिरी : कुवारबाव येथे बँकेने सील केलेले घर तोडून अतिक्रमण; एकावर गुन्हा







