GRAMIN SEARCH BANNER

“मत विकणारे गावांच्या विकासाचे आणि लोकशाहीचे खरे वैरी!” – सुहास खंडागळे यांचा घणाघात

Gramin Varta
144 Views

पैशांच्या वाढत्या राजकारणामुळेच गाव विकास समितीची जि.प,पंचायत समिती निवडणुकीतून माघार; सुहास खंडागळे यांनी मांडले विदारक वास्तव

संगमेश्वर तालुक्यातील राजकीय पटलावर ‘गाव विकास समिती’च्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवली जाईल अशी अपेक्षा असतानाच, समितीने निवडणुकीतून माघार घेऊन  धक्का दिला. अलीकडे पैशांचे राजकारण वाढल्याने निवडणुका न लढण्याचा निर्णय संघटनेने घेतला.केवळ विरोधासाठी विरोध न करता, व्यवस्थेतील सडकेपण लोकांसमोर मांडणारे तरुण नेतृत्व गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी या मुलाखतीत आपला संताप व्यक्त केला आहे. सामान्य मतदारांची बदललेली मानसिकता, पैशांचा बाजार आणि विकासापेक्षा वैयक्तिक स्वार्थाला दिले जाणारे महत्त्व यावर त्यांनी ओढलेले ताशेरे आजच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारे आहेत… ग्रामीण वार्ताचे संपादक मुझमिल काझी यांनी सुहास खंडागळे यांची घेतलेली सविस्तर मुलाखत…

प्रश्न:- सुहास जी,तुम्ही आधी संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुका लढणार असल्याचे संकेत दिले होते. मग असे अचानक काय झालं की गाव विकास समिती संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतून बाहेर झाली?
सुहास खंडागळे:-कुणासाठी लढायची निवडणूक ? गाव विकास समितीने फक्त प्रश्नांवर आवाज उठवावा इतकीच काहींची अपेक्षा असते.आम्ही ज्यांच्यासाठी उभे राहतो तेही निवडणुकीत वेगळा विचार करतात हे सत्य आम्हाला लवकर समजलं.आताची परिस्थिती पाहिली तर तुम्हाला वाटतं आमच्या सारख्या सामान्य तरुणांची संघटना गाव विकास समिती निवडणूक लढून त्यात टिकेल? बरं ज्यांच्यासाठी लढायचे त्या सामान्य मतदाराला विकासाच्या राजकारणापेक्षा पैशांचे राजकारण अधिक महत्वाचे वाटत असेल तर मला नाही वाटत येणाऱ्या पन्नास वर्षात सुद्धा आपल्या गावांचा विकास होईल… मी आज भविष्य सांगतोय… जर लोक सुधारली नाहीत..त्यांनी पैशांचं राजकारण सोडलं नाही..तर यांच्या पुढच्या पिढ्या इथं गावात दिसणार नाहीत. त्या स्थलांतर होऊन,विस्थापित होऊन त्यांना शहरांमध्येच राहावं लागेल… आता वैयक्तिक स्वार्थासाठी मतदान करणारे, निवडणुकीनंतर मात्र आरोग्य, शिक्षण,रोजगार आणि पायाभूत सुविधांसाठी वणवण भटकताना दिसतात ना ? यातून बोध कुणी घ्यायचा..

प्रश्न:- निवडणुकीत पैसे देणारे आहेत म्हणून लोकं पैसे घेत असतील…
सुहास खंडागळे: माझं उलट मत झालं आहे… घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे म्हणून लोकशाहीचे वाटोळे होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पैसे देणाऱ्याला निवडणुकीत कॉपी करून पास व्हायचं आहे… पण त्याला कॉपी करून पास व्हायला लोकं का मदत करतात हा माझा सवाल आहे. लोकांच्या या बदललेल्या मानसिकतेमुळे गरीब आणि प्रामाणिक लोकसेवा करणारा उमेदवार निवडून येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.तुम्हाला सांगतो जेव्हा हा समाज अशिक्षित होता तेव्हा तो विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करत होता. पैशांच्या राजकारणाला थारा नव्हता… पण आज गावागावात शिकलेले तरुण आणि लोकं निवडणुकीत काय करत आहेत हा ज्याने त्याने गांभीर्याने विचार करावा असा विषय आहे.

प्रश्न: पैशांच्या राजकारणामुळे तुम्ही फार व्यथित आणि निराश आहात?
सुहास खंडागळे:- लोकांना खरी लोकशाही अजूनही समजली नाही याचं दुःख आहे. आज आपला देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षे झाली, लोकशाही समृद्ध होण्याऐवजी ती रसातळाला जाताना आपण पाहतोय आणि त्यात शिकलेल्या लोकांचा सहभाग आहे हे पाहून व्यथित व्हायला होतंय… काही उच्चशिक्षित लोक सुद्धा पैशांच्या राजकारणापुढे गुडघे टेकतात ही त्याहून गंभीर बाब आहे.तुम्ही कल्पना करू शकत नाहीत जो माणूस स्वतःच घर दार स्वतःच्या हिमतीवर चालवतो तोही निवडणुकीत हजार दोन हजार रुपयांची अपेक्षा ठेवत असेल तर डोंबलाचा विकास होणार आहे गावांचा… ग्राउंड वरची स्थिती भयानक आहे.

प्रश्न:- एकीकडे तुम्ही गाव विकास समिती म्हणून निवडणूक लढत नाहीत. मग दुसरीकडे काही उमेदवाराना पाठिंबा कसा काय दिलात?
सुहास खंडागळे:- आम्ही प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात नसलो तरी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही ही गोष्ट आधी आपण लक्षात घ्या. जिथे माणूस योग्य आहे आणि त्यांनी पाठिंबा मागितला आहे तर विचार करून आम्ही पाठिंबा देऊ शकतो.हातीव गणात आमचे अध्यक्ष उदय गोताड यांनी स्थानिक भूमिका लक्षात घेऊन त्यांच्या स्तरावर तो पाठिंबा दिला आहे. पैशांचा माज दाखवून जर कोण सामान्य माणसाला खरेदी करण्याची भूमिका ठेवणार असेल, त्यातून समाजाचे दूरगामी नुकसान होणार असेल तर त्या विरोधात उदय गोताड यांनी ती जाहीर भूमिका घेतली आहे.

प्रश्न:-पण आज पैशाशिवाय राजकारण कसं शक्य आहे ? सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष पैशांचा वापर करताना दिसतात…
सुहास खंडागळे:- त्यासाठीच आम्ही लोकांमध्ये जनजागृती करतोय. आम्ही निवडणूक लढत नसलो तरी आम्ही लोकांना हेच सांगतोय, कुणालाही मत द्या पण ते पैसे न घेता द्या. विचारांना आणि विकासाला मत द्या. लोकांच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की सामान्य उमेदवार टिकू शकत नाही.खरंतर आज पर्यंत आपण असं म्हणत होतो की उमेदवार लोकांना बिघडवतात, पण आता जेव्हा मी पाहतो तेव्हा हे लक्षात येतंय, लोक सुद्धा या बिघडण्यामध्ये आणि बिघडवण्यामध्ये तितकेच जबाबदार आहेत. लोकांना बदलावं लागेल.

प्रश्न:- तुमचा लोकांवर रोष का? तुमच्या सोबत लोक येत नाहीत म्हणून हा राग आहे का ?
सुहास खंडागळे:- लोकांना ज्यांचे विचार पटतील त्यांच्यासोबत त्यांनी जावं.पण लोकं ज्यांच्या सोबत जातात त्यांनी त्यांच्या सोबत पैसे न घेता जावं इतकीच माफक अपेक्षा आहे.अलीकडच्या निवडणुका आणि पैशांचा बाजार पाहिल्याने हा संताप आहे.लोकशाहीत राजे असणारे पैसे घेऊन जेव्हा मतदान करतात ना तेव्हा ते त्या नेत्यांचे गुलाम होतात हे लोकांना कळत नाही याचा हा राग आहे.आमच्या बरोबर लोकं येत नाहीत म्हणून राग करण्याचा प्रश्नच नाही.

प्रश्न: पाच तारखेला मतदान आहे. तुम्ही निवडणुकीत नाही. तरीही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी लोकांना काय सांगाल?
सुहास खंडागळे:- काय सांगणार ? लोकांचं आधीच ठरलेलं असत. आपण सांगून थोडच ऐकणार आहेत? जो योग्य उमेदवार वाटेल. विकास करेल अशा माणसाला निवडून द्यायला हवं. आपलं मत न विकता अभिमानाने मतदान करायला हवं. ज्याला कुणाला मत देऊ त्याला आपलं मत दान करायला हवं.. लोकांनी यावेळी फोडाफोडी न करणाऱ्या आणि विकासासाठी आपल्या पाठी उभ्या राहणाऱ्या माणसाला साथ द्यावी…

प्रश्न:- शेवटचा प्रश्न,पैशांच राजकारण कधी संपेल?
सुहास खंडागळे:- जेव्हा लोकच पैशांच्या राजकारणाला लाथ मारतील तेव्हाच हे पैशांचे राजकारण थांबेल… नेते हे राजकारण स्वतःहून थांबविणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

Total Visitor Counter

3072266
Share This Article