गुहागर: वनसंपदेची अवैध चोरी करणाऱ्यांवर गुहागर वनपरिक्षेत्रात कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तालुक्यातील पालपेणे कुंभारवाडी येथे अवैधरित्या खैर लाकडाची चोरी होत असल्याची तक्रार सोन्या शिवराम पालकर यांनी दाखल केली होती. या तक्रारीनुसार, वनविभागाने त्वरित कारवाई करत विनापरवाना वाहतूक होत असलेला ४.३२० घनमीटर सोलीव किटा (खैर) आणि त्यासाठी वापरलेला बोलेरो टेम्पो (एमएच-०८-एपी५२३६) जप्त केला आहे.
जप्त केलेल्या खैराची अंदाजित किंमत एक लाख रुपये आहे, तर टेम्पोची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे. या दोन्ही वस्तू सध्या वनविभागाच्या ताब्यात ठेवण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील वाहनचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कारवाईसाठी हे संपूर्ण प्रकरण वनविभाग चिपळूणकडे पाठविण्यात आले आहे.
या कारवाईच्या निमित्ताने पंचनामादी कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण), सहायक वन संरक्षक रत्नागिरी (चिपळूण) आणि परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गुहागर व वनरक्षक अडूर यांनी कायद्याच्या चौकटीत राहून ही प्रभावी कारवाई केली आहे. अवैध वृक्षतोड आणि तस्करी रोखण्यासाठी वनविभाग कटिबद्ध असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.







