संगमेश्वर : पै. एच. डि. माध्यमिक विद्यालय, कुरधुंडा (हायस्कूल) येथील विद्यार्थ्यांची वाहतूक अडचण अखेर मार्गी लागली आहे. विद्यालयाचे संचालक सर मोहसीन मुल्ला, शिक्षकवर्ग, तसेच पालक व ग्रामस्थ यांच्या सामूहिक प्रयत्नातून आजपासून (दि. ५ ऑगस्ट) देवरूख – कानरकोंड – परचुरी वेद्रेवाडी – संगमेश्वर या मार्गावर नवीन एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमामागे शाळेच्या शिक्षकांचा मोठा पाठिंबा असून, मुख्याध्यापक शेख सर, पवार सर, चिंचवलकर सर, शेख सर, अमोल सर, जाकीर सर यांचे मोलाचे योगदान लाभले. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासातील अडथळा दूर करण्यासाठी या बस सेवेचे आयोजन करण्यात आले.
यासाठी पालक मंगेश गोनबरे, सत्यवान वेद्रे, संदीप कळंबटे, संदीप वेद्रे, सुधाकर वेद्रे, अशोक गोनबरे यांचे विशेष सहकार्य लाभले. महिला पालक वर्गानेही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
याशिवाय परचुरीतील मान्यवर ग्रामस्थ दाजी कळंबटे, माजी सैनिक अनंत शिंदे, उपसरपंच प्रदीप चंदरकर, चंद्रकांत पवार, पोलीस पाटील सुधीर लिंगायत यांनीही बस सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.
या नव्या बस सेवेच्या शुभारंभाने शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, या उपक्रमाबद्दल पालक व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी एकत्र येऊन समाजाने दाखवलेली ही एकजूट प्रेरणादायी ठरत आहे.
शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष एस.टी. सेवा सुरू; पालक व ग्रामस्थांच्या पुढाकाराने सोडवला प्रवासाचा प्रश्न!
