GRAMIN SEARCH BANNER

रायगडमध्ये महायुतीत राजकीय उलथापालथ

Gramin Varta
171 Views

रायगड: जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर रायगडच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. सर्वाधिक 21 जागा जिंकूनही शिवसेना (शिंदे) सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने महाडचे आमदार आणि राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला सज्जड इशारा दिला आहे.

“जर त्यांना आमची गरज नसेल, तर आम्हालाही पुढचा विचार करावा लागेल,” असे गोगावले यांनी म्हंटले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत 59 पैकी 21 जागा शिवसेना (शिंदे), 16 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 15 भाजपने जिंकल्या आहेत. मात्र सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजपसोबतच ठाकरे गटालाही एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही शिंदेसेना सत्तेबाहेर फेकली जाईल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.या पार्श्वभूमीवर गोगावले यांनी महायुतीत एकत्र येण्याची गरज व्यक्त केली असली तरी “पुढे विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आहेत, त्यावेळी आम्हीही विचार करू,” असे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांची नुकतीच झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. रायगडमध्ये सत्ता समीकरणे झपाट्याने बदलत असून पुढील काही दिवसांत मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रायगडच्या सत्तानाट्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3285265
Share This Article