गुहागर (प्रतिनिधी) – तालुक्यातील शृंगारतळी येथील ‘वेदांत ज्वेलरी’ मधील १० महिलांना पेढ्यातून झालेल्या विषबाधेचा तपास आता अन्न व औषध प्रशासन करत आहे. शृंगारतळी येथील एका बेकरीमधून हे पेढे खरेदी करण्यात आले होते. पोलिसांनी या बेकरीमधील पेढ्यांचे उर्वरित बॉक्स ताब्यात घेतले आहेत. मात्र, हे पेढे एका नजीकच्या जिल्ह्यातील कंपनीकडून पुरवले गेल्याने, या प्रकरणात नेमकी कारवाई कोणावर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विषबाधेमुळे अस्वस्थ झालेल्या सर्व महिलांची प्रकृती आता स्थिर असून, उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या घटनेमुळे तालुक्यात पॅकबंद पेढे खरेदी करण्याबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा पुढील तपास अन्न व औषध प्रशासन करत आहे. जिल्ह्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, शृंगारतळी येथील बेकरीमधील पॅकबंद अन्नपदार्थांचा उर्वरित साठा जप्त करून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या पॅकबंद पेढ्यांच्या पुरवठादार कंपनीची पुढील चौकशी सध्या सुरू आहे. या तपासातूनच विषबाधेचे मूळ कारण आणि दोषी व्यक्ती किंवा कंपनी समोर येईल, अशी आशा आहे.