मिऱ्या-नागपूर महामार्गाचा बोजवारा! नाचणे ते जेके फाईल्स सर्विस रोड अपूर्ण; धुळीने नागरिक त्रस्त, अपघाताचा धोका वाढला

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

अजय सावंत / रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सुरू असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना मात्र मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महामार्गालगत असलेले सर्विस रोड अनेक ठिकाणी अद्याप अपूर्णच असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे वाहनचालक आणि स्थानिक रहिवासी अक्षरशः हैराण झाले आहेत.

नाचणे येथील गणेश कॉलनी ते जेके फाईल्स सर्कल दरम्यानचा सर्विस रोड सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. काही भागात अर्धवट डांबरीकरण झाले असले तरी मोठा भाग अजूनही खडी व लाल मातीवरच सोडण्यात आला आहे. परिणामी, या मार्गावर सतत धुळीचे लोट उडत असून नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ आणि दैनंदिन प्रवासात प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा होते. त्यातच पादचारीही मोठ्या संख्येने वावरत असल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे. खडी आणि उखडलेल्या रस्त्यामुळे वाहनांचा तोल जात असून कधीही गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष?

या महामार्गाचे कार्यालय कोल्हापूर येथे असल्याने स्थानिक पातळीवर कामावर कोणतीही ठोस देखरेख नसल्याचा आरोप होत आहे. ठेकेदार मनमानी करत असून संबंधित अधिकाऱ्याचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.

अवकाळी पावसाची धोक्याची घंटा

हवामान खात्याने कोकणात अवकाळी पावसाचा इशारा दिला असताना या अपूर्ण रस्त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्यास संपूर्ण मार्ग चिखलमय होऊन वाहने घसरून अपघाताची शक्यता आहे. अशा स्थितीत नागरिकांना चालणेही मुश्किल होईल, तर वाहनचालकांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरू शकतो.

सध्या तरी प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून “तात्काळ सर्विस रोडचे पूर्ण डांबरीकरण करा” अशी तीव्र मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. अन्यथा, एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *