चिपळूण : येथील रेल्वे स्थानकासमोर असलेल्या साई मंदिराशेजारी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एकूण पाचशे तीस ग्रॅम वजनाचा गांजा सदृश अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला असून एका इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात कठोर मोहीम राबवली जात असून, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाण्यांना यासंदर्भात सख्त निर्देश दिले आहेत.
या मोहिमेला अनुसरून चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक ३१ जुलै २०२६ रोजी हद्दीमध्ये गस्त घालत असताना हे यश आले. पेट्रोलिंग दरम्यान वालोपे येथील रेल्वे स्टेशन समोरील साई मंदिराशेजारी एक इसम हातामध्ये पिशवी घेऊन संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी पंचांसमक्ष त्या व्यक्तीला थांबवून त्याची विचारपूस केली.
चौकशी दरम्यान त्याने आपले नाव अब्दुल गफ्फार हमीद म्हालदार, वय 48 वर्ष, रा. चिवेली मोहल्ला, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी असे असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीत व त्यातील प्लास्टिक पिशवीमध्ये पाचशे तीस ग्रॅम वजनाचा, तीस हजार रुपयांच्या किमतीचा गांजा सदृश अमली पदार्थ आढळून आला. हा अमली पदार्थ बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी आरोपीला जागीच ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, पोलीस हवालदार संदीप माणके, वृषाल शेटकर, रोशन पवार, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वनगे आणि रुपेश जोगी यांच्या पथकाने पार पाडली आहे.






