GRAMIN SEARCH BANNER

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात कडवई ग्रामस्थ सरसावले; लोकसहभागातून प्रथम क्रमांक मिळवण्याचा निर्धार

Gramin Varta
397 Views

कडवई / मिलिंद चव्हाण: संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेतला असून, या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी येथील ग्रामस्थ एकवटले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी कडवई ग्रामदेवता मंदिर येथे ग्रामस्थांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व ग्रामस्थांनी या अभियानात गावाला विशेष यश मिळवून देण्यासाठी जोमाने काम करण्याचा एकमताने निर्णय घेतला.

कडवई ग्रामपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, गटविकास अधिकारी आनंद कोकरे आणि सहायक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली यश मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. ग्रामविकास अधिकारी राहुलकुमार चौधरी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सरपंच विशाखा कुवळेकर, उपसरपंच दत्ताराम ओकटे, माजी सरपंच वसंत उजगावकर आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उत्साहाने कार्यरत आहेत. यासाठी विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. ग्रामस्थांना लोकसहभागातून विकास, स्वच्छता, ग्रामपंचायत सुशासन, विजेची बचत, श्रमदानातून विकास अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करून सहभागासाठी प्रवृत्त केले जात आहे.

याच अनुषंगाने आयोजित केलेल्या बैठकीला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी राहुलकुमार चौधरी यांनी अभियानाची सविस्तर माहिती देऊन, अभियानाच्या यशात सहभागी होण्याचे आवाहन केले. या आवाहनाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गावातील पथदीप सौरऊर्जेवर करण्यासाठी लोकवर्गणी देण्याचे मान्य केले. तसेच, आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीला दिले. यावेळी थकित घरपट्टी आणि पाणीपट्टी त्वरित जमा करण्याचे आवाहनही गावाच्या वतीने ग्रामस्थांना करण्यात आले.

या अभियानात तन, मन आणि धनाने उतरून गावाला उज्ज्वल यश मिळवून देण्याचे आवाहन अनेक मान्यवरांच्या वतीने करण्यात आले. यावेळी गावचे गावप्रमुख विष्णू ओकटे, देवजी ओकटे, सर्व मानकरी, सरपंच विशाखा कुवळेकर, उपसरपंच दत्ताराम ओकटे, तंटामुक्ती अध्यक्ष हरिश्चंद्र कांबळे, जमाते मुस्लिमिनचे सादिक काझी, राजन कापडी, जितेंद्र चव्हाण, माजी सरपंच वसंत उजगावकर, बापू कदम, मारुती शिंदे, विजय कदम, अनंत उजगावकर, विलास पुरोहित, प्रकाश कुंभार, अनिल घोसाळकर, विजय कुवळेकर, मिलिंद शिंदे, राजेंद्र बोथरे यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी, वरदानदेवी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3199595
Share This Article