रत्नागिरी : रत्नागिरीत गाजलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील याचा बाप दर्शन पाटील याचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या खून प्रकरणातील 5 आरोपींपैकी 2 आरोपींचा मृत्यू झाला आहे. राकेश जंगम आणि दर्शन पाटील अशी मृत्यू आरोपींची नावे आहेत. तर दुर्वास पाटील, विश्वास पवार, नीलेश भिंगार्डे हे सध्या तुरुंगात आहेत.
जयगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तिहेरी खूनप्रकरणातील संशयित दर्शन शांताराम पाटील (57) याचा उपचारादरम्यान मुंबईमधील जे.जे. रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला. प्रकृती ठिक नसल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालयाने 23 सप्टेंबर रोजी त्याला जामीन मंजूर केला होता. मृत सीताराम वीरच्या हत्येप्रकरणी दर्शन पाटीलवर भारतीय न्याय संहिता कलम 302, 201, 109 सह 34 भा.दं.सं. नुसार गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर मुलाला खून करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असून पोलिसांच्या अटकेनंतर दर्शन पाटीलची प्रकृती अत्यंत खालावली होती. सुरुवातीला त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले होते. वैद्यकीय अहवालांनुसार, तो ‘मल्टिपल ऑर्गन डिस्फंक्शन सिंड्रोम’ने ग्रस्त असल्यामुळे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
दरम्यान, दर्शन पाटीलच्या वकिलांनी सादर केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर न्यायालयाने दर्शन पाटील हा गंभीर आजारी असल्याचे मान्य केले. त्यानुसार, न्यायालयाने वैयक्तिक 50 हजार रुपयांच्या जामिनावर आणि तितक्याच रकमेच्या हमीवर त्याची सुटका करण्याचे आदेश दिले होते. यानंतर त्याला मुंबईत दाखल करण्यात आले होते. जे जे रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
खंडाळा तिहेरी हत्याकांड प्रकरणातील दुर्वास पाटीलच्या बापाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू
