GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : नाचणे येथे आईच्या खून प्रकरणात मुलाला दिलासा, जामीन मंजूर

Gramin Varta
681 Views

रत्नागिरी :नाचणे शांतीनगर येथील आईच्या मृत्यूप्रकरणी अटक झालेल्या अनिकेत शशिकांत तेली (रा. शांतीनगर, नाचणे) या तरुणाला रत्नागिरी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा निर्णय दिला.

ही घटना २५ ऑगस्ट रोजी घडली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, अनिकेत हा आपल्या आई पूजा शशिकांत तेली (५०) आणि आजीसोबत राहत होता. त्या रात्री पूजा तेली या झोपेत असताना धारदार चाकूने त्यांचा गळा चिरल्याचा आरोप अनिकेतवर करण्यात आला होता. त्यानंतर त्याने स्वतःच्या हातावर वार करून आणि ड्रेनेज क्लिनर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी नोंद शहर पोलिसांत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनिकेतविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती.

जामीनासाठी दाखल केलेल्या अर्जात अनिकेत याच्या वकिलामार्फत न्यायालयात सांगण्यात आले की, अनिकेत निर्दोष असून त्याने गुन्हा केलेला नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर आई मानसिक नैराश्यात गेली होती आणि तिने आत्महत्या केली. ते दृश्य पाहून अनिकेतने आत्महत्येचा प्रयत्न केला. तो काही काळ रुग्णालयात उपचार घेत होता. त्याच्यावर यापूर्वी कोणतेही गुन्हे नोंदलेले नाहीत, तसेच तो फरार होणार नाही, अशी बाजू मांडण्यात आली.

सरकारी पक्षाने आरोपीच्या जामीनाला विरोध दर्शवला. “हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपीला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. साक्षीदार हे त्याचे नातेवाईक आहेत. तसेच त्याने यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पुन्हा तसे होण्याची शक्यता आहे,” असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

न्यायालयाने आदेशात नमूद केले की, तपास पूर्ण झाला असून दोषारोपपत्र दाखल झाले आहे. आरोपी ११ सप्टेंबरपासून कारागृहात असून त्याच्या पोटातील जखमांमुळे अजूनही वैद्यकीय उपचारांची गरज आहे. वैद्यकीय अहवालानुसार दीर्घकाळ तुरुंगात राहणे त्याच्या आरोग्यास घातक ठरू शकते.

तसेच, या प्रकरणात खुनाचे थेट पुरावे नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. वडिलांच्या आत्महत्येमुळे कुटुंब मानसिक तणावाखाली होते आणि त्याचा परिणाम आई व मुलावर झाला होता. आरोपी तरुण असून आरोग्यदृष्ट्या अशक्त आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणांवर आणि परिस्थितीचा विचार करून जामीन मंजूर करणे योग्य ठरेल, असे न्यायालयाने नमूद केले.

Total Visitor Counter

3200117
Share This Article