रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०२६-२७ या वर्षाचा ७३० कोटी २५ लाख रुपयांचा सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारुप आराखडा आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच रखडलेली सिंधुरत्न समृद्ध योजना पुन्हा सुरू करून त्यासाठी ५०० कोटी रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित या बैठकीत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहितेमुळे रखडलेली प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी आणि १५ मार्चपर्यंत कोणत्याही परिस्थितीत निधी वितरणाची कार्यवाही पूर्ण करावी.
बैठकीच्या प्रारंभी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर झालेल्या चर्चेत पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. विशेषतः बीएसएनएल नेटवर्कची समस्या आणि महावितरणचा वीज पुरवठा याबाबत आढावा घेत असताना, शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. मुख्यमंत्री अन्नपूर्णा आणि सीएमएजीपी योजनेचा लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकर्सची बैठक घ्यावी आणि लाभार्थ्यांना त्रास देणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करण्याचे धाडसी आदेशही त्यांनी दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना मिळतो की नाही, याचा तालुकानिहाय अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या संदर्भात पालकमंत्र्यांनी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. खासगी रुग्णालयांमध्ये गोरगरीब जनतेसाठी १० टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक असून, तिथून खरोखर उपचार मिळतात का, याचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांनी सादर करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ‘संविधान भवन’ उभारण्यासाठी महसूल विभागाने तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश दिले. नद्यांतील गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार करून नोव्हेंबरमध्येच कामाचे आदेश देण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत उपस्थित होते, तर खासदार सुनील तटकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदवला.








