खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भोस्ते घाट चढत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक इर्टिगा कार घाटातील संरक्षण भिंतीवर जोरदार धडकली. या भीषण अपघातात कारमधील चार प्रवासी जखमी झाले असून गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा अपघात रविवारी सकाळी ९:४० च्या सुमारास घडला. मुंबईतील मालाड येथून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०३ बी जे २२९० या क्रमांकाची इर्टिगा कार भोस्ते घाट चढत होती. यावेळी अचानक चालकाचा ताबा सुटला आणि गाडी थेट घाटाच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीवर जाऊन आदळली. या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नाणीजधाम रुग्णवाहिकेचे चालक सुरज हंबीर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व जखमींना तात्काळ कळंबणी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या अपघातात निकिता अनंत साळवी (३०), अश्विनी अनंत साळवी (५८), अनंत शंकर साळवी (६१) आणि पाच वर्षांचा चिमुरडा अद्विक कृष्णा नवाले हे जखमी झाले आहेत. हे सर्वजण मुंबईतील मालाड येथील रहिवासी असून रत्नागिरीकडे जात असताना त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला. जखमींवर सध्या कळंबणी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.






