GRAMIN SEARCH BANNER

कलिंगड खाऊन मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; मुख्य साक्षीदाराचा मृत्यू की ठरवून केलेला घातपात?

Gramin Varta
447 Views

मुंबई: मुंबईतील पायधूनी परिसरात कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता या प्रकरणाला एक खळबळजनक वळण मिळाले आहे. प्राथमिक दृष्ट्या अन्नबाधा वाटणाऱ्या या घटनेमागे एक मोठा गुन्हेगारी कट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणातील मयत अब्दुल्ला डोकाडिया हे एका गंभीर गुन्ह्यातील मुख्य साक्षीदार असल्याचे समोर आले असून, त्यांच्या मृत्यूमुळे पोलीस तपासाची चक्रे आता बिल्डर आणि मेकअप आर्टिस्ट महिलेच्या वादाभोवती फिरू लागली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या हमीदा शेख या मेकअप आर्टिस्ट महिलेने मुंबईतील बिल्डर आफताब याच्या विरोधात फसवणूक आणि अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर या दोघांनी २०२० मध्ये विवाह केला होता. मात्र, लग्नापूर्वी आफताबने व्यवसायासाठी हमीदा यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले होते आणि ही रक्कम घेण्यासाठी त्याने अब्दुल्ला डोकाडिया यांना पाठवले होते. याच कारणामुळे या आर्थिक व्यवहारात अब्दुल्ला हे एकमेव आणि सर्वात महत्त्वाचे साक्षीदार होते. हमीदा यांनी आफताबवर केवळ आर्थिक फसवणुकीचेच नव्हे, तर अनैसर्गिक छळाचेही गंभीर आरोप करत २०२३ मध्ये तक्रार नोंदवली होती.

या प्रकरणात आफताबवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल असून पोलीस तपास सुरू होता. अशातच या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेल्या अब्दुल्ला डोकाडिया यांचा संपूर्ण कुटुंबासह संशयास्पद मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा केवळ योगायोग आहे की साक्षीदाराला वाटेतून बाजूला करण्यासाठी आखलेला पूर्वनियोजित घातपात, यादृष्टीने आता पोलीस कसून चौकशी करत आहेत. कलिंगडातून विषबाधा झाली की जाणीवपूर्वक विष देण्यात आले, याचे धागेदोरे या जुन्या प्रकरणाशी जोडले जात असल्याने मुंबईत मोठी खळबळ उडाली आहे.

Total Visitor Counter

3354851
Share This Article