GRAMIN SEARCH BANNER

कोकणातील कलागुणांना बळ; ‘कलारंग’तर्फे पाचल येथे भव्य चित्रकला कार्यशाळा संपन्न

Gramin Varta
25 Views

पाचल/तुषार पाचलकर): कोकणातील मातीमध्ये दडलेल्या तरुण कला प्रतिभेला योग्य दिशा देणे आणि स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने कार्यरत असलेल्या ‘कलारंग’ संस्थेच्या वतीने पाचल येथील श्री केदारलिंग मंदिरात नुकतेच एका प्रेरणादायी कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. केवळ चित्रकला शिकवणे एवढाच या कार्यशाळेचा मर्यादित उद्देश नसून, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला नवे वळण देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना कलेकडे पाहण्याची एक नवी आणि प्रगल्भ दृष्टी देणे, हा उद्देश समोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यशाळेला विद्यार्थी आणि कलाप्रेमींचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

या विशेष कार्यशाळेत लांजा येथील प्रसिद्ध उदयोन्मुख कलाकार सिद्धेश मनोहर यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सिद्धेश यादव यांच्या विशिष्ट शैलीमुळे आणि संवाद साधण्याच्या सहज पद्धतीमुळे विद्यार्थ्यांशी त्यांचा पटकन सूर जुळला. त्यांनी विद्यार्थ्यांना रेखाटन (स्केचिंग), विविध रंगछटा आणि आपली सर्जनशील अभिव्यक्ती कागदावर कशी उतरवायची, याचे सखोल आणि तांत्रिक ज्ञान दिले. केवळ पुस्तकी ज्ञान न देता, प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे त्यांनी कलेचे बारकावे उलगडून दाखवले, ज्यामुळे उपस्थितांना एक वेगळीच अनुभूती मिळाली. विद्यार्थ्यांच्या मनातील कलेविषयीची भीती दूर करून त्यांना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी या कार्यशाळेने एक समर्थ माध्यम उपलब्ध करून दिले.

या संपूर्ण उपक्रमाच्या नियोजनात आणि यशस्वितेमध्ये ‘कलारंग’ टीमचा वाटा मोलाचा राहिला. पाचल येथील आर्किटेक्ट आणि ‘कलारंग’चे संस्थापक अनिकेत अशोक सक्रे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला. त्यांना पाचल हायस्कूलचे कलाशिक्षक सिद्धार्थ जाधव सर आणि कमर्शिअल आर्टिस्ट हेमंत लब्दे यांची भक्कम साथ लाभली. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि मार्गदर्शनामुळे हे सत्र विद्यार्थ्यांसाठी अत्यंत समृद्ध आणि उत्साहवर्धक ठरले. तसेच, या कार्यशाळेच्या व्यवस्थापनात कलारंगचे स्वयंसेवक आर्यन अभय धावडे आणि प्रतीक्षा पांडुरंग ढवळे यांनी अत्यंत जबाबदारीने भूमिका पार पाडली.

कार्यशाळेसाठी श्री केदारलिंग मंदिर संस्थानाचे विशेष सहकार्य लाभले. मंदिराचे विश्वस्त किशोरभाई नारकर आणि एकनाथ गुरव यांनी मंदिर परिसर आणि आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच, सरस्वती विद्या मंदिर आणि पाचल हायस्कूल यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या कला शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देऊन मोलाचे सहकार्य केले. स्थानिक कला, कलाकार आणि त्यांच्या यशोगाथा जगासमोर आणणे, तसेच कोकणातील कलाकारांचे एक मजबूत जाळे निर्माण करणे, हे ‘कलारंग’चे मुख्य ध्येय आहे. भविष्यातही अशाच प्रकारे कार्यशाळा, कलागट भेटी आणि कलाकारांच्या सहयोगातून कोकणातील सांस्कृतिक आणि कला क्षेत्र अधिक समृद्ध करण्यासाठी ‘कलारंग’ कटिबद्ध राहील, असा विश्वास आयोजकांनी यावेळी व्यक्त केला.

Total Visitor Counter

3367004
Share This Article