खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही उपकेंद्रात चोरीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने उपकेंद्राच्या कार्यालयीन परिसरातील मोकळ्या जागेत ठेवलेली महागडी कंट्रोल केबल लंपास केली असून, याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरी २८ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, लोटे एमआयडीसी येथील महापारेषणच्या उपकेंद्र परिसरातील कार्यालयासमोर विविध कामांसाठी आवश्यक असलेली कंट्रोल केबल मोकळ्या भागात साठवून ठेवण्यात आली होती. चोरट्याने या संधीचा फायदा घेत फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने या केबलवर डल्ला मारला. चोरीला गेलेल्या मालामध्ये दोन लाकडी डूममध्ये गुंडाळलेली ४ कोअरची १२० मीटर कंट्रोल केबल, जिची किंमत १९ हजार २०० रुपये आहे आणि १९ कोअरची २० मीटर मोकळी गुंडाळून ठेवलेली ११ हजार २४० रुपये किमतीची कंट्रोल केबल, अशा एकूण ३० हजार ४०० रुपये किमतीच्या मालाचा समावेश आहे.
याप्रकरणी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता हेमंत रमेश गुडेकर (वय ३५, रा. वाणी पेठ, खेड) यांनी शनिवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय दंड संहिता कायदा कलम ३०३(२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ७४/२०२६ नुसार नोंदवला आहे. औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला असून, खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






