गणपतीपुळे/ वैभव पवार: रत्नागिरी तालुक्यातील खालगाव-गोताडवाडी येथील श्री जाकादेवी देवस्थानात शुक्रवारी देवदिवाळीच्या पारंपरिक उत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. पहाटेपासूनच दर्शनासाठी लागलेल्या रांगा पाहून जाकादेवीविषयीच्या भक्तिभावाची साक्षच मिळत होती. दशक्रोशीसह जिल्हा, परजिल्ह्यातून तब्बल वीस हजारांहून अधिक भाविकांनी उपस्थित राहून उत्सवाला मोठी शोभा आणली.
शुक्रवारी सकाळी नित्यपूजेनंतर भक्तांनी दर्शनाची लगबग सुरू केली. देवदिवाळी यात्रेच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून मंदिर परिसरात भाविकांची सततची वर्दळ सुरू होती. दर्शनानंतर दुपारी साडेबारा ते तीन या वेळेत सर्वांसाठी खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. संध्याकाळी आरती, भोवत्या आणि रात्री स्थानिकांनी सादर केलेले नमन कार्यक्रमाने वातावरण आणखी भक्तिमय झाले.
उत्सवाची दुसरी परंपरागत पर्वणी शनिवारी साजरी होत असून २२ नोव्हेंबरला सत्यनारायण महापूजा, महिलांसाठी हळदीकुंकू, तसेच दिवसभर तीर्थप्रसाद अशी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. रात्री साडेआठला होणारी आरती-भोवत्या आणि दहाच्या सुमारास ‘आंधळा मागतो डोळा’ या गाजलेल्या दोन अंकी विनोदी नाटकाचे सादरीकरण हा उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरणार आहे. ओमकार ओमसाई थिएटर, मुंबई यांचा हा प्रयोग पाहण्यासाठीही अनेक भाविक उत्सुक आहेत.
या यात्रोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री जाकादेवी देवस्थान खालगाव–गोताडवाडी, जाकादेवी देवस्थान मुंबई मंडळ, कुलस्वामिनी सेवा मंडळ तसेच महिला मंडळाने मोठ्या श्रद्धेने मेहनत घेतली. परिसरात रोषणाईची उजळण, सजवलेला मंदिर परिसर, पाण्याची सुविधा, भाविकांना ये-जा सुलभ व्हावी यासाठी देण्यात आलेल्या एसटीच्या विशेष सेवांनी संपूर्ण उत्सव अधिक सोयीस्कर व आनंददायी झाला.
लोकप्रतिनिधींपासून ते ग्रामीण भागातील सामान्य भाविकांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने देवस्थान समितीने समाधान व्यक्त केले आहे. भक्तिभाव, परंपरा आणि उत्साहाचा संगम असलेली जाकादेवीची देवदिवाळी यात्रा यंदाही मोठ्या थाटात पार पडत आहे.
जाकादेवी यात्रेला भाविकांची अलोट गर्दी, 20 हजाराहून अधिक भाविकांची उपस्थिती






