संगमेश्वर येथे महामार्गाचे काम सुरू; रात्री वाहतूक कोंडीची समस्या टोकाला, पोलिसांची तातडीने दखल

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

एजाज पटेल / संगमेश्वर : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू असताना संगमेश्वर परिसरातील वाहतूक व्यवस्थेची मात्र अक्षरशः वाट लगली आहे. महत्त्वाच्या संगमेश्वर चौकात दिवसा पोलीस कर्मचारी तैनात असल्याने वाहतूक काही प्रमाणात सुरळीत ठेवली जाते; मात्र रात्रीच्या वेळी पोलिसांची अनुपस्थिती या भागातील वाहतूक कोंडीला अधिकच चिघळवत आहे.

राष्ट्रीय महामार्गावरून रात्री मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहने, खासगी बस, तसेच जड मालवाहू ट्रक धावत असतात. त्यात चौपदरीकरणाच्या कामासाठी अनेक ठिकाणी सुरू असलेली खोदाई, अरुंद पर्यायी मार्ग आणि अर्धवट उभे असलेले बांधकाम साहित्य यांमुळे रस्ता अधिकच धोकादायक बनला आहे. परिणामी रात्रीच्या वेळी संगमेश्वर चौकात वाहनांची मोठी कोंडी निर्माण होऊन लांबच लांब रांगा लागत आहेत.

वाहतूक कोंडी इतकी तीव्र होते की, अनेकवेळा प्रवाशांनाच गाड्यांमधून उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी मानवी साखळीप्रमाणे मार्गदर्शन करावे लागत असल्याचे चित्र वारंवार दिसत होते. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले होतेच, पण काही प्रसंगी रुग्णवाहिका अडकून रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या तक्रारीही पुढे येत होत्या.

या गंभीर स्थितीवर वाहनचालक आणि प्रवासी नागरिकांनी वारंवार मागणी होती.संगमेश्वर चौकात रात्रीच्या वेळी उद्भवणारी वाहतूक कोंडी  सुरळीत करण्यासाठी पोलीस कर्मचारी  कायमस्वरूपी नियुक्त करावेत मात्र याकडे डोळेझाक केले जात होते.अखेर या बाबत ग्रामीण वार्ता या समाज माध्यमात वृत्त प्रकाशित झाल्यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेत रात्रीची होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बुधवारी रात्री पोलीस कर्मचारी तैनात असल्याचे व वाहतूक कोंडी सुरळीत करत असल्याचे दिसून आले.

काल मध्यरात्रीपासून संगमेश्वर एसटी स्टँडसमोर पोलिसांनी महामार्गावरील कोंडी सोडवण्यासाठी सक्रिय पद्धतीने काम केले. वाहतूक अडकलेली ठिकठिकाणी सुरळीत करण्यात आली. रात्री दीर्घकाळानंतर प्रवासी व वाहनचालकांनी सुटकेचा श्वास घेत “ग्रामीण वार्ता समाज माध्यमचे ”चे आभार  व्यक्त करत समाधान व्यक्त केले.वाहन चालक आणि  नागरिकांचे म्हणणे आहे की, “महामार्गाचे काम सुरू असताना कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती आवश्यक आहे. प्रशासनाने ही पावले उचलली नसती तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता होती.”

महामार्ग प्राधिकरण, पोलिस विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी परस्पर सहकार्य करून महामार्ग काम व्यवस्थापन व वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी आता अधिक जोर पकडत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *