GRAMIN SEARCH BANNER

फाटकच्या स्नेहसंमेलनात ‘आय पॉपस्टार’ गायिका राधिका भिडेने जिंकली मने

Gramin Varta
496 Views

रत्नागिरी: फाटक हायस्कूल व गांगण, केळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रसिद्ध ‘आय पॉपस्टार’ गायिका, संगीतकार आणि शाळेची माजी विद्यार्थिनी राधिका भिडे हिच्या उपस्थितीने रंगत आणली. विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहिलेल्या राधिकाने आपल्या गायकीने आणि विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाने सर्वांची मने जिंकली.

या कार्यक्रमात दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा ॲड. सुमिता भावे यांच्या हस्ते राधिकाचा विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आणि विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर राधिकाने ‘मन धावतया’ आणि ‘उजेड पडला छान गनोबा’ ही लोकप्रिय गीते सादर केली, ज्यावर विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांना आपल्या परफॉर्मन्समध्ये सहभागी करून घेत तिने सादर केलेल्या गाण्यांमुळे कार्यक्रमातील वातावरण अत्यंत उत्साही झाले होते.

स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित लोकनृत्य स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलाविष्कार सादर केले. नववी आणि दहावीच्या गटात नववी ‘ई’ तुकडीने सादर केलेल्या ‘गोंधळ’ नृत्याने प्रथम क्रमांक पटकावला. दहावी ‘अ’च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वारकरी नृत्याला द्वितीय, तर नववी ‘अ’च्या शेतकरी नृत्याला तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
या सोहळ्याला मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, संस्थेचे अन्य पदाधिकारी आणि सांस्कृतिक विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश नाचणकर व शिल्परेखा जोशी यांनी केले.

Total Visitor Counter

3366943
Share This Article