GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी आगाराचा बेजबाबदार कारभार : प्रवाशांना ठेवले पावणे दोन तास ताटकळ, महिलांचा संताप

Gramin Varta
386 Views

रत्नागिरी /राजन लाड: आज रत्नागिरी बसस्थानकावर प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. नियोजित वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता सुटणारी रत्नागिरी–आंबोळगड बस पावणे दोन तास उशिरा सुटली. या दरम्यान या गाडीसाठी थांबलेल्या ५० ते ६० प्रवाशांना महिला, लहान मुले व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश – प्रचंड त्रास सहन करावा लागला.

पंक्चरच्या कारणावर पावणे दोन तासांचा विलंब

सायंकाळी सहा वाजता स्थानकात आलेली ही बस पंक्चर झाल्याने तातडीने डेपोत नेण्यात आली. प्रवाशांनी वारंवार कंट्रोल केबिनला विचारणा केली, परंतु त्यांना प्रत्येक वेळी “गाडी आता येईल” असेच उत्तर मिळाले.

पत्रकाराचा हस्तक्षेप – अनेक कारणं सांगितली, मग लगेच गाडी

काही प्रवाशांनी ही बाब पत्रकार राजन लाड यांच्या निदर्शनास आणली. पत्रकारांनी ताबडतोब कंट्रोल केबिन आणि डेपो मॅनेजर श्री. पाटील यांच्याशी संपर्क साधला. डेपो मॅनेजरकडून कर्मचाऱ्यांची कमतरता, आधी आलेल्या गाड्या पहाव्या लागणे आणि इतर तांत्रिक अडचणी यांसह अनेक कारणे सांगितली गेली. मात्र यानंतर लगेच गाडी स्थानकात दाखल झाली.

“केवळ पंचर काढण्यासाठी पावणेदोन तास लागत असतील, तर काही मोठे काम झाले असते तर किती वेळ लागला असता?”“जर वेळ जास्त लागणार होता, तर दुसरी गाडी का पाठवली गेली नाही?”

या प्रश्नांमुळे प्रवाशांचा संताप अधिक वाढला आहे. रत्नागिरी–आंबोळगड मार्गावरील प्रवासी या गाडीसाठी अवलंबून आहेत आणि रात्री उशिरा थांब्यांवरून घरी पोहोचण्याचा धोकादायक अनुभव घ्यावा लागतो. विशेषतः महिलांनी रात्री लहान मुलांसह थांबावे लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.

डेपो मॅनेजरने कर्मचाऱ्यांची कमतरता, गाड्यांची गर्दी यांचा हवाला दिला. तरीही प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना न केल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Total Visitor Counter

3368889
Share This Article