खेड: आपल्या कर्तव्यावर असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्याला मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील दस्तूरी गावाजवळ घडली आहे. एस.टी. बसला साईड दिली नाही, या किरकोळ कारणावरून हुंडाई क्रेटा गाडीतील चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी महिलेने एस.टी. चालक व वाहकासोबत हुज्जत घालत हा प्रकार केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड एस.टी. डेपोचे वाहक पंढरी खुशाल गायकवाड हे बस क्रमांक MH 40/Y 9749 मधून खेड-दापोली मार्गावर आपली सेवा बजावत होते. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.०० वाजेच्या सुमारास बस दस्तूरी गावाजवळील मंडणगड फाट्यावर आली असता, मागून येणाऱ्या हुंडाई क्रेटा (क्र. MH 08/AN/5981) वरील चालकाने बसच्या समोर आपली गाडी आडवी लावून बस थांबवली. बस चालकाने साईड दिली नाही, या कारणावरून क्रेटा चालकाने एस.टी. चालक परशुराम नागरगोजे यांच्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. आपल्या सहकाऱ्याचे भांडण सोडवण्यासाठी वाहक पंढरी गायकवाड मध्यस्थी करण्यासाठी गेले असता, क्रेटा गाडीतील अनोळखी महिलेने ‘तू मध्ये का आलास?’ असे म्हणत गायकवाड यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्या कानाखाली मारली.
लोकसेवकाला धाकाने त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी बलप्रयोग केल्याप्रकरणी आणि मारहाण करून कर्तव्यात अडथळा आणल्याबद्दल फिर्यादी गायकवाड यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत क्रेटा चालक आणि संबंधित महिलेवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून भररस्त्यात एस.टी. कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे चालक-वाहक वर्गात संतापाचे वातावरण आहे. नागरिकांनी अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.






