नवी मुंबई: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेचा मोठा फटका नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरातील व्यापाऱ्यांना बसला आहे. आयुक्त मुंढे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ३० आणि ३१ मे रोजी एपीएमसी बाजारपेठेसह नवी मुंबई व ठाणे परिसरात अचानक धाडी टाकल्या.
उन्हाळ्यात वाढलेल्या आंब्याच्या मागणीचा गैरफायदा घेत काही व्यापारी फळांवर थेट इथिलिनसदृश स्प्रे फवारून ती कृत्रिमरीत्या पिकवत असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन करून आंबे पिकवणाऱ्या तीन मोठ्या आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईत ३,४५३ किलो आंबे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत ११ लाख १२ हजार ८५० रुपये आहे. नियमांनुसार फळांवर थेट इथिलिन स्प्रेचा वापर करण्यास सक्त बंदी असून फळे पिकवण्यासाठी केवळ मान्यताप्राप्त इथिलिन गॅस चेंबरचा वापर करणे बंधनकारक आहे. प्रशासनाने जप्त आंब्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
याच मोहिमेदरम्यान जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त २९ ते ३१ मे या कालावधीत गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या बेकायदेशीर विक्रीविरोधातही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण ३६ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून ४ लाख ७४ हजार ४०७ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत ३७ जणांना अटक करण्यात आली आहे, तर गंभीर नियमभंग करणाऱ्या ३१ आस्थापनांना थेट सील ठोकण्यात आले आहे. एपीएमसीसारख्या मोठ्या घाऊक बाजारपेठेत सुरू असलेल्या या गैरप्रकारांवर प्रशासनाने थेट प्रहार केल्याने संपूर्ण व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधातील ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करावे आणि अशी कोणतीही माहिती असल्यास प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा लेखी स्वरूपात तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.






