GRAMIN SEARCH BANNER

दापोली तालुका मराठी भाषा अधिकारी म्हणून बाबू घाडीगावकर यांची नियुक्ती

Gramin Varta
47 Views

दापोली: दापोली तालुका मराठी भाषा अधिकारी म्हणून बाबू घाडीगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठी भाषेला केंद्र सरकारने दि. ४ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेद्वारे अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे.

त्या अनुषंगाने ३ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिवस तर दि.३ ऑक्टोबर ते दि. ९ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देताना या भाषेची गेल्या २५०० वर्षांपासूनची जुनी परंपरा गृहीत धरण्यात आली आहे. प्राचीन व जुन्या काळातील ग्रंथांची, लिपींची व भाषा व्यवहारांची, विविध कलाप्रकारातील मराठी भाषेच्या वापराची गौरवशाली परंपरा विविध समाजघटकांसमोर यावी, यासाठी अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या तरतुदीनुसार राज्य शासनाच्या प्रत्येक कार्यालयात एक मराठी भाषा अधिकारी असणार आहे.

या अनुषंगाने दापोली तालुक्यासाठी जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेतील विषय शिक्षक तथा कोकणातील प्रथितयश साहित्यिक बाबू घाडीगावकर यांची दापोली तालुका मराठी भाषा अधिकारी म्हणून दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी नियुक्ती केली आहे.

बाबू घाडीगावकर गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य व लेखन क्षेत्रात कार्यरत असून ते विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांतून नियमित स्तंभलेखन करतात. कोकणातील ग्रामीण लोकजीवन हा त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय असून त्यांनी या विषयावर विपुल प्रमाणात कथा, कविता व ललितलेखन केले आहे. त्यांच्या तीन हजारहून अधिक कथा, कविता व ललितलेख विविध वृत्तपत्रे, नियतकालिके व दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचा ‘बाबा’ हा कवितासंग्रह तर ‘वणवा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला असून काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद तसेच काव्यप्रेमी शिक्षक मंच यांसारख्या साहित्यविषयक संस्थांमधून काम करीत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील शेकडो नवोदित लेखक लेखनाकडे वळले आहेत.

Total Visitor Counter

2648144
Share This Article