रत्नागिरी: पत्नीने सोडल्याने आलेल्या नैराश्यातून आणि दारूच्या व्यसनामुळे एका ३० वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना चिपळूण तालुक्यातील पोफळी होडेवाडी येथे घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.अमोल दत्ताराम पंडव (वय ३०, रा. पोफळी होडेवाडी, ता. चिपळूण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेची नोंद अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल पंडव यांचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते. मात्र, लग्नानंतर काही काळातच त्यांची पत्नी त्यांना सोडून निघून गेली आणि त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. पत्नी सोडून गेल्यामुळे अमोल पूर्णपणे नैराश्याच्या गर्तेत गेला होता आणि तेव्हापासून तो दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता.
दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८.०० ते ८.४५ वाजण्याच्या दरम्यान, याच नैराश्यातून अमोलने आपल्या राहत्या घरातील बेडरूममधील छताच्या लोखंडी अँगलला उपरण्याने गळफास लावून घेतला.
ही घटना उघडकीस आल्यानंतर, खबर देणारे जितेंद्र नारायण पंडव आणि त्यांचे भाऊ दत्ताराम पंडव यांनी तात्काळ अमोलला उपचारासाठी शिरगाव येथील डॉक्टरांकडे नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून अमोलला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद दि. ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १२.१६ वाजता अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस १९४ नुसार करण्यात आली आहे. तरुण मुलाने पत्नी सोडून गेल्याच्या धक्क्यातून जीवन संपविल्यामुळे पंडव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.