मुंबई: मीरारोडमध्ये राठीच्या मुद्द्यावरुन दुकानदाराला झालेल्या मारहाणीवरुन व्यापाऱ्यांनी मराठी भाषिकांविरुद्ध मोर्चा काढला होता. त्यानंतर मंगळवारी मराठी भाषिकांकडून मीरारोडमध्ये मोर्चाची हाक देण्यात आली.
या मोर्चात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीसह विविध मराठी भाषिक संघटना रस्त्यावर उतरणार होत्या. मात्र या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर सर्व विरोधाला झुगारून मराठी माणसांनी मोर्चा काढला. अशातच आता मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. पांडे यांच्या जागी निकेश कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाची हाक देण्यात आली होती. मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार होता. मात्र त्याआधीच मोर्चाला परवानगी नाकारत मराठी कार्यकर्त्यांच्या धरपकडीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. रात्रीपासून या परिसरात पोलिसांनी आंदोलकांविरोधात कारवाई करत अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. त्यामुळे संघर्ष आणखी वाढला. मात्र पोलीस प्रशासन मोर्चा न काढू देण्यावर ठाम होतं. सर्व विरोधाला झुगारून मराठी माणसांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावली आणि मोर्चाला सुरूवात झाली. दुसरीकडे पोलिसांनी मोर्चाला परवानगी का नाकारली? असा सवाल करत मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली.
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
