GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : नायलॉनच्या जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराची सुखरूप सुटका

Gramin Varta
11 Views

रत्नागिरी/ तुषार पाचलकर: रत्नागिरी तालुक्यातील मौजे सोमेश्वर येथील मांडवकर वाडी रस्त्यालगत असलेल्या आंबा कलम बागेत आज सकाळी खवले मांजर जातीचा वन्यप्राणी नायलॉनच्या कुंपणात अडकलेला आढळून आला. समीर सुभाष भातडे यांच्या मालकीच्या बागेत ही घटना घडली. याबाबतची माहिती निसर्गप्रेमी व वन्यप्राणी संरक्षक रोहन वारेकर यांना मिळताच त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधून संबंधित ठिकाणी धाव घेतली.

खवले मांजर चिखलात आणि नायलॉनच्या जाळ्यात अडकले होते. वनविभागाच्या मदतीने काळजीपूर्वक रेस्क्यू करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केल्यानंतर प्राणी सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मोकळे करण्यात आले. या रेस्क्यू मोहिमेत वनपाल न्हानू गावडे, वनरक्षक शर्वरी कदम, प्राणीमित्र महेश धोत्रे यांचा सहभाग होता.

ही कार्यवाही विभागीय वनाधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. परीक्षेत्र वन अधिकारी श्री प्रकाश सुतार यांनी देखील या मोहिमेत सहकार्य केले.

खवले मांजर हे संरक्षित वन्यप्राणी असून, अशा घटना घडल्यास तात्काळ वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरिजा देसाई यांनी केले आहे.

Total Visitor Counter

2652424
Share This Article