दापोली: दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघर, तालुका दापोली यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दत्तजयंती निमित्त लाडघर समुद्रकिनारी समुद्राच्या वाळूमधील सायकल आणि धावण्याच्या शर्यती तसेच बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे ५९ वे वर्ष असून, रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता या शर्यतींचा थरार लाडघरच्या समुद्रकिनाऱ्यावर अनुभवता येणार आहे.
दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघरचे अध्यक्ष दीपक बोरकर, उपाध्यक्ष निलेश मोरे आणि सचिव राजन संनकुळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९६५ सालापासून मंडळातर्फे सायकल आणि धावण्याच्या शर्यतींचे आयोजन केले जात आहे. लाडघर दत्त मंदिर येथे साजऱ्या होणाऱ्या दत्तजयंती निमित्ताने या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
या सायकल शर्यतीचे अंतर २ किलोमीटर आहे. मात्र, लाडघर समुद्रकिनाऱ्यावर वाळूमध्ये, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सायकल चालवणे किंवा धावणे हे अत्यंत आव्हानात्मक असते. सुक्या वाळूमध्ये सायकल रुतते आणि जास्त वेगाने पळता येत नाही, त्यामुळे ही स्पर्धा अधिक अटीतटीची होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि त्यात भाग घेण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी उसळते.
सायकल आणि धावण्याच्या स्पर्धा खुल्या गटात घेण्यात येणार असून, यासाठी गिअर किंवा नॉन-गिअर कोणतीही सायकल वापरता येईल. विशेष म्हणजे, या शर्यतींसाठी कोणतीही नोंदणी फी नाही किंवा आगाऊ नावनोंदणी करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. सायकल आणि धावण्याच्या शर्यतीनंतर सायंकाळी ५ वाजता बैलगाडी स्पर्धा होतील.
दत्त सांस्कृतिक मंडळाने या निमित्ताने सर्वांना आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करण्याची, मैदानी खेळ खेळण्याची, पर्यावरणाचे जतन करण्याची आणि आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक स्पर्धक अभिनय कर्देकर (७७६७०७५३५२) आणि वृषाल सुर्वे (७३५०४८९२८७) यांच्याशी संपर्क साधू शकतात.




