रत्नागिरी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची चिन्हे असतानाच रत्नागिरी तालुक्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय हादरा बसला आहे. तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मिरजोळे जिल्हा परिषद गटातील प्रमुख शिलेदारांनी आपल्या पदांचा तडकाफडकी राजीनामा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मिरजोळे ग्रामपंचायतीच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात हा भव्य प्रवेश सोहळा पार पडला. यामध्ये मिरजोळे विभागाचे विभागप्रमुख वैभव पाटील, उपविभाग प्रमुख डॉ. मयुरेश पाटील आणि विभाग संघटक शुभानंद पाटील यांसारख्या आक्रमक नेत्यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे नेते सत्ताधारी पक्षात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, अखेर दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले.
या सोहळ्यात केवळ हे तीन प्रमुख नेतेच नव्हे, तर त्यांच्यासोबत मोठी फळी देखील शिवसेनेत सामील झाली आहे. यामध्ये माजी पंचायत समिती सभापती विभांजली पाटील, युवा सेना विभाग प्रमुख विकास सनगरे, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य संचिता सनगरे, खेडशीच्या उपसरपंच मानसी पेडणेकर, मंगेश पेडणेकर, शाखा प्रमुख संजय पाडावे आणि युवा सेना शाखा प्रमुख प्रियेश कांबळे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी भगवा हाती धरला. सद्यस्थितीत ठाकरे गटात काम करणे शक्य नसल्याची भूमिका मांडत या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रवेश सोहळा मिरजोळे ग्रामस्थांच्या अलोट गर्दीत पार पडला, ज्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बाबू म्हाप यांच्यासह शिंदे गटातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
नगरपालिका आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली असताना, मिरजोळे सारख्या महत्त्वाच्या बालेकिल्ल्यातून तगडे पदाधिकारी बाहेर पडणे हा ठाकरे गटासाठी मोठा ‘सेटबॅक’ मानला जात आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे मिरजोळे गटातील जुनी राजकीय समीकरणे पूर्णपणे विस्कळीत झाली आहेत. स्थानिक पातळीवर सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच शिंदे गटाने ही मोठी खेळी खेळून ठाकरे गटाला जबरदस्त शह दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या राजकीय भूकंपामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, या बदलाचा भविष्यातील निकालांवर काय परिणाम होणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.







