राजापूर : सातवाहन काळातील ऐतिहासिक व्यापारी मार्ग असलेल्या अणुस्कुरा घाटातील उगवाई मंदिर परिसरात राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ आणि पाचल येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण आणि जंगल ट्रेल उपक्रम पार पडला.
इतिहास, निसर्गप्रेम आणि पर्यावरणसंवर्धनाचा त्रिवेणी संगम साधणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.
घाटमाथ्यावर वसलेले उगवाईचे प्राचीन मंदिर, त्यासमोरील दाट वनराईतून जाणारा मातीचा तांबडा रस्ता आणि मंदिराच्या पाठीमागे धुक्याच्या कुशीत हरवणारे निळसर अर्जुना धरण, यामुळे परिसर अधिकच निसर्गमय वाटला. या परिसरातून जाणारा काळ्या दगडातील व्यापारी मार्ग सातवाहन काळातील असून त्यावरून राजापूर बंदरातून कोल्हापूर, कराड, मलकापूर या व्यापारपेठांकडे मालवाहतूक होत असे. या ऐतिहासिक वारशाचे साक्षीदार म्हणून परिसरातील शिलालेख आजही लक्ष वेधतो.
वृक्षारोपण उपक्रमात देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी उत्साहाने सहभाग घेतला. जंगल ट्रेलदरम्यान इतिहास अभ्यासकांनी मार्गदर्शन करून उपस्थितांना या घाटवाटेचा ऐतिहासिक व सांस्कृतिक संदर्भ उलगडून दाखवला.
या उपक्रमाला राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, गणेश चव्हाण, रमेश काटकर, विजय हटकर, दीपक नागवेकर, प्रा. एम. आर. पाटील, इतिहास अभ्यासक सुनील कदम, विराज चव्हाण, शिपोशी सरपंच हरेश जाधव, तळवडे सरपंच सौ. गायत्री साळवी, सामाजिक कार्यकर्ते सुहास आयरे, आप्पा साळवी, किशोर नारकर, उमेश दळवी, तसेच प्राध्यापक विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
येरडव, करक, पाचल, तळवडे, अणुस्कुरा आदी गावांतील ग्रामस्थांनीही मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. परिसराच्या हरित विकासात योगदान असलेला आणि ऐतिहासिक वारशाची जपणूक करणारा स्तुत्य उपक्रम भविष्यात सातत्याने राबवावा, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
राजापूर: सातवाहनकालीन अणुस्कुरा घाट परिसरात वृक्षारोपण






