GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : खंडाळ्यात हार्डवेअर दुकानाला आग; गोडाऊन व गाडी जळून खाक; 15 लाखांचे नुकसान

Gramin Varta
673 Views

वैभव पवार / गणपतीपुळे

रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथील मुख्य बाजारपेठेतील यामिनी हार्डवेअर अ‍ॅण्ड सेल्स या दुकानाला रविवारी (दि. ७) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दुकानाचे गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाले असून, सीएनजी असलेली नवीन इको कंपनीची गाडीही आगीत भस्मसात झाल्याची माहिती आहे.

खंडाळा येथील नामांकित व्यापारी मोहनलाल चौधरी यांच्या मालकीचे हे हार्डवेअर दुकान आणि वाहन असून या आगीत त्यांचे अंदाजे १५ ते २० लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

रविवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर काही वेळातच दुकानातून धूर निघत असल्याचे कामगारांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने मालकांना याची माहिती दिली. त्यानंतर संबंधित यंत्रणांना कळवण्यात आले.

आगीची माहिती मिळताच जिंदल कंपनीचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत दुकानातील गोडाऊनसह साहित्य आणि वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या घटनेचा पंचनामा जयगड पोलिस ठाण्याकडून करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास दीडपिसे आणि हेडकॉन्स्टेबल मंदार मोहिते करीत आहेत.

Total Visitor Counter

3366849
Share This Article