रत्नागिरी: शिरगाव उद्यमनगरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; दोन शेळ्यांचा फडशा पाडल्याने नागरिकांत दहशत

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी: शहरालगतच्या शिरगाव परिसरातील उद्यमनगरमध्ये बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालत दोन शेळ्यांची निर्घृण शिकार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. उद्यमनगर येथील रहिवासी नईम अली काळसेकर यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याकडून पालन करण्यासाठी दोन शेळ्या घेतल्या होत्या आणि त्यांच्या घराच्या पाठीमागील गोठ्यात या शेळ्या बांधलेल्या होत्या. ३१ मार्च २०२६ रोजी रात्री ३.०० ते ३.३० च्या सुमारास बिबट्याने या गोठ्यावर हल्ला चढवला आणि मध्यरात्रीच्या शांततेत दोन्ही शेळ्यांना जागीच ठार केले.

विशेष म्हणजे ही थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामध्ये बिबट्या स्पष्टपणे दिसत नसला तरी त्याचा डरकाळी फोडल्यासारखा आवाज आणि शेळ्यांचा केविलवाणा ओरडण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. या पुराव्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आता सिद्ध झाले आहे. अर्जदार नईम काळसेकर यांची प्रकृती अनेकदा खालावलेली असते, त्यामुळे त्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसून या शेळ्यांवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे काळसेकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन नुकसानभरपाई द्यावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता शिरगाव परिसरातून केली जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *