GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी तहसीलदारांची सोशल मीडियावर बदनामी; परशुराम कदम यांच्यावर गुन्हा दाखल

रत्नागिरी: रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी हातखंबा येथील परशुराम मारुती कदम याच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीने एका व्हिडिओद्वारे तहसीलदार कार्यालयातील कामकाजाबाबत चुकीचा दावा केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम कदम याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला होता. यामध्ये त्याने खानू येथील योगिता सुवारे यांचा धान्य लाभाचा अर्ज दोन वर्षांपासून तहसीलदार कार्यालयात प्रलंबित असल्याचा दावा केला. मी स्वतः तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना सांगितल्यानंतरच हे काम झाले, असे विधान त्याने या व्हिडिओत केले होते. तसेच भविष्यात कोणाचे काम अडल्यास मला संपर्क साधा, असे आवाहनही त्याने जनतेला केले होते.

तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी या व्हिडिओवर तीव्र आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. हा प्रकार लोकांमध्ये प्रशासकीय कामकाजाविषयी संभ्रम निर्माण करणारा असून, यामुळे आपल्या पदाची प्रतिमा डागाळली गेली आहे आणि सामाजिक लौकिकास बाधा पोहोचली आहे, असे म्हात्रे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीची दखल घेत रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५६(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुर्वे करत असून, तक्रारदाराला न्यायालयात दाद मागण्याची समज देण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3399921
Share This Article