GRAMIN SEARCH BANNER

राजापूर : कशेळी येथे मध्यरात्री घराला भीषण आग; आठ लाखांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

राजापूर :तालुक्यातील कशेळी येथे शुक्रवारी मध्यरात्री एका घराला अचानक आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत कशेळी येथील हरिश्चंद्र मारुती फोडकर व तुषार फोडकर यांच्या राहत्या घराचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेच्या वेळी घरात चार जण उपस्थित होते; मात्र प्रसंगावधान राखल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

शुक्रवारी रात्री सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास फोडकर यांच्या घरातून उष्णतेचे झटके जाणवू लागल्याने आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिस्थिती ओळखून त्यांनी तातडीने घराबाहेर पडत स्वतःचा बचाव केला. त्यामुळे घरातील चारही व्यक्तींना कोणतीही दुखापत झाली नाही.

आगीची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र आग वेगाने पसरल्याने ती आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. परिणामी घर पूर्णतः जळून खाक झाले असून घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच शिंदेसेना तालुका प्रमुख दिपक नागले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या. यावेळी सरपंच सौ. दि. दि. हळदणकर, तलाठी काजल सगट, पोलीस पाटील श्री. सुतार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पंचनामा करण्यात आला असून, या आगीत सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज ग्रामस्थ व प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3485370
Share This Article